वसई : वसई विरार महानगरपालिकेने केलेली परिवहन सेवेची तिकीट दरवाढ मागे घेतली नाही तर येत्या ३० जुलैला भीक मांगो आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे.पालिकेने अचानक दरवाढ करून प्रवाशांच्या माथी आर्थिक बोजा मारला आहे. यात परिवहन सेवा चालवणाऱ्या ठेकेदाराचा फायदा पाहिला गेला आहे. परिवहन सेवा अद्यापही सुरळीत सुरु झालेली नाही. ठेकेदाराने जुनाट आणि नादुरुस्त बसेस आणल्या आहेत. अनेक बसेस धूर टाकून प्रदूषण करीत आहेत. ठेका पद्धतीवर असलेले चालक व वाहक प्रवाशांशी उद्धट वागतात. यात सुधारणा करण्याची गरज असताना ठेकेदाराच्या फायद्यासाठी दरवाढ केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केला आहे. पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वाहन भत्त्यात वाढ करून घेतली आहे. आता नगरसेवक मानधन वाढीची मागणी करीत आहेत. दुसरीकडे, पालिकेच्या तिजोरीत खणखणाट झाला आहे. असे असताना लोकांचे हित जपण्याऐवजी स्वत:चे हित जपणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना भीक मागून पैसे देणार आहोत. त्यासाठी भीक मांगो आंदोलन केले जाणार आहे,असे गुंजाळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
परिवहन दरवाढीविरोधात राकाँचे वसईत भीखमांगो
By admin | Published: July 24, 2016 4:01 AM