वसई : शहरातील वाढत्या विनयभंग आणि बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पालघर जिल्हा ग्रामीण पोलीसांनी दामिनी पथकाची स्थापना केली असून,त्यात विशेष प्रशिक्षित महिलांचा समावेश करण्यात आला आहे.भर रस्त्यावर, गल्लीबोळात तरुणींची रोड रोमियोंकडून छेड काढली जाते. गर्दीचा फायदा घेवून अनेक जण महिलांशी लगटही करतात. त्यांची तक्रार करण्यास महिलांकडून संकोच केला जातो. तक्रार केल्यास पोलीसांच्या चौकशीचा फेरा आणि त्यानतंर दुखावलेल्या रोड रोमीयोकडून होणाऱ्या दगाफटक्याच्या चिंंतेमुळे कित्येक तरुणी गप्प बसतात. त्यामुळे छेड काढणाऱ्यांची हिंमत वाढत जाते.ही बाब लक्षात घेवूनच दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.१४ बुलेट गाड्यांवरून विशेष प्रशिक्षित अशा महिला शाळा, महाविद्यालये बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी या महिला गस्त घालणार आहेत. त्यासाठी पोलीसांनी १४ बुलेटची मागणी महापालिकेकडे केली आहे.बीट मार्शलच्या धर्तीवर हे पथक कार्य करणार आहे.या महिला पोलीसांना फक्त गस्त घालण्याचे काम देण्यात येईल.त्यांना मार्शल आर्टचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे वेळप्रसंगी त्या गुंडांशी सामनाही करू शकतील, असे पालघरच्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
महिलांच्या सुरक्षेसाठी वसईत दामिनी पथक
By admin | Published: October 12, 2016 3:53 AM