विरार : गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या भाववाढीने मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात माेठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या थंडीसाेबतच विरार-वसईच्या बाजारांत भाज्यांची आवकही वाढल्याने पालेभाज्या, फळभाज्यांचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील भार कमी झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.विरार येथे चंदनसार, मनवेल पाडा, विरार पश्चिम मलांग मैदान आणि नालासोपारा सेंट्रल पार्क येथील बाजारांत घाऊक प्रमाणात भाजीपाला येतो. वाशी आणि थेट नाशिक येथून १०० ते २०० टन भाजीपाला या बाजारात दररोज उतरवला जातो. नालासोपारा संतोष भुवन आणि वसईतही मोठ्या प्रमाणात असे बाजार लागत असून या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात भाजीपाला उतरवला जातो. काही महिने या ठिकाणी येणाऱ्या पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले हाेते. त्यामुळे आधीच काेराेनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना भाजी खरेदी करताना सतत खिशाचा विचार करावा लागत हाेता. आता हिवाळ्यात भाज्यांचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात आवक वाढल्याचे भाजी व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच परिसरातील आदिवासी समाज त्यांच्या परसात उगवत असलेला भाजीपाला येथील किरकोळ बाजारांत विक्री करीत असल्याने आवक वाढली आहे. १५ दिवसांपूर्वी ६५ रुपयांपर्यंत भाव खाणाऱ्या कांद्याचा एपीएमसी मार्केटमधील भाव २० रुपये किलो इतका खाली आला आहे.
पावसाळ्यात शेतातून भाजीपाला बाजारात येण्यात मोठ्या अडचणी येत असतात. कित्येक वेळा तर अतिवृष्टी आणि तत्सम संकटांमुळे भाजीपाल्याची नासधूस होते. साहजिकच या काळात भाज्यांचे भाव चढे असतात. त्या तुलनेत हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची लागवड केली जाते. त्यामुळे उपलब्धता व आवक वाढते. त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाला स्वस्त झाला आहे.- सचिन हडकर, मालक, भाजीविक्रेता