वसई : वसई-विरार परिसरात भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला आहे. सर्व भाज्या १०० ते १५० रू. किलो या दराने विकण्यात येत आहेत. एकीकडे मच्छीचे मार्केट ओस पडले असताना भाज्यांचे भावही चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे नागरीकांना सध्या अव्वाच्या सव्वा दराने भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.वसई विरार परिसरातील भाजी मार्केटमध्ये नाशिक, कळंब, अर्नाळा, पालघर व डहाणू या भागातून भाजीपाला येत असतो. मध्यंतरीच्या काळात भाज्यांचे भाव घसरले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून भाज्यांच्या दराने अचानक उसळी घेतली. हिरवा वटाणा १६० रू. किलो, कांदा ४० रू. किलो, टॉमेटो ३० ते ३५ रू. किलो, कोबी, घेवडा, गवारी, भेंडी, दुधी, भोपळा प्रत्येकी १०० रू. किलो या दराने विकण्यात येत आहे. त्यामुळे भाज्यांनाही मागणी कमी प्रमाणात होत आहे. मच्छीमार्केट ओस पडले आहेत त्यामुळे भाज्यांना चांगली मागणी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु भाज्यांच्या चढ्या दरामुळे ग्राहकवर्ग फिरकत नसल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.भाज्यांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. मनमानी पद्धतीने दर लावण्यात येतात. अन्य पर्याय नसल्यामुळे भाज्या खरेदी करणे भाग असते. बाहेरून येणाऱ्या भाज्यांचा दर अधिक असल्यामुळे स्थानिक भाजीविक्रेतेही त्याच दराने आपली भाजी विकत असतात. - सुनिला यादव, विरारघाऊक बाजारातच चढ्या दराने भाजी खरेदी करावी लागते. या भाज्या ने-आण करणे, त्यावर येणारा खर्च वाढतो आहे. भाज्यांची आवक कमी झाली कि दर वाढतात ही वस्तुस्थिती आहे. सध्या घाऊक विक्रेतेही बाहेरून येणाऱ्या भाज्यांच्या दराशी बरोबरी करून विक्री करू लागल्यामुळे भाज्या महाग झाल्या आहेत हे खरे आहे.- शामसुंदर पासवान, भाजीविक्रेता
वसईत अव्वाच्या सव्वा दराने भाजीविक्री
By admin | Published: August 11, 2015 11:29 PM