जव्हार - शहरात काही ठिकाणी दुचाकीमधून इंधन चोरीच्या घटना घडत आहेत. दरम्यान, सोनार आळी परिसरात धनवर्षा इमारतीच्या तळमजल्यावर दुचाकी उभ्या असताना रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरांनी पेट्रोल काढता आले नाही, म्हणून त्यांनी त्या इमारतीत वास्तव्य करीत असलेल्या कैलास जाधव यांच्या वाहनाची तोडफोड करून फरार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.सोनार आळी येथे ४ डिसेंबर रोजी एका इमारतीच्या व्हरांड्यात नागरिकांच्या ८ दुचाकींमधून पेट्रोल काढण्यात आले. ज्या दुचाकींतून पेट्रोल काढणे शक्य झाले नाही, अशा दुचाकी लोटून देणे, पेट्रोल टाकी फोडणे, साईड स्टँडची स्प्रिंग काढून टाकणे, पेट्रोल पाइप कापणे असे नुकसान करण्यात आले होते. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली आहे.मागील वर्षी अशाच एका टोळीला जव्हार पोलिसांनी पकडून चोप दिला होता. मात्र आता पुन्हा इंधन चोरीचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अशा चोरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करणे हे जव्हार पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
४ डिसेंबर रोजी सोनार आळी परिसरातील दुचाकींवर कोणाचे लक्ष नसल्याचा फायदा घेत ४ दुचाकींमधून पेट्रोल काढण्यात आले आणि ३ दुचाकींचे नुकसान करण्यात आले. यामध्ये माझ्या दुचाकीचेही नुकसान झाले.- कैलास जाधव, स्थानिक नागरिक
जव्हार शहरात ठिकठिकाणी रात्री १० नंतर ग्रुप करून उभे राहणाऱ्यांना मज्जाव करण्यात येईल. या घटनेनंतर शहरात सर्वत्र रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविण्यात येईल. या टोळीला शोधून काढण्यात येईल. नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे.- अप्पासाहेब लेंगरे, पोलीस निरीक्षक, जव्हार पोलीस ठाणे