मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: नायगाव पश्चिमेच्या रेल्वे स्थानकालगत असलेल्या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली असून यात १५ ते १६ दुचाकी जळून खाक झाली आहेत.
नायगाव पश्चिमेच्या भागात रेल्वे स्थानकाला लागून व नायगाव उड्डाणपुलाच्या खालील वाहने पार्किंग मध्ये ठेवण्यात आली होती. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास अचानकपणे वाहन तळात उभ्या असलेल्या वाहनांनी पेट घेतला. एका जवळ एक वाहन उभे असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना व पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळत आज अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले याआगीत सुमारे १५ ते १६ दुचाकी वाहने जळून खाक झाली असून वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या वाहन तळामध्ये सुमारे शेकडो गाड्या उभ्या होत्या मात्र नायगाव पश्चिमेच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने त्या गाड्या बाजूला केल्याने मोठी हानी टळली आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही घटनास्थळी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जळून खाक झालेल्या वाहनांचा पंचनामा केला आहे.