शशिकांत ठाकूरकासा : पावसाळा आला की पूर्वी ग्रामीण भागात सर्रास रानभाज्याचा वापर होत असे. मात्र आता रानभाज्या दुर्मिळ झाल्याने त्याचा वापरही कमी होऊ लागला आहे. पावसाळ्यात पूर्वी खेड्यापाड्यातील गरीब कुटुंबे तर पावसाळाभर आहारात रानभाज्याचाच वापर करत असत. काहीजण जंगलात जाऊन रानभाज्या शोधून त्या शहरीभागात विकून काही लोकांना रोजगार ही मिळत असे.
रानभाज्यामध्ये शेवली, कोळीभाजी, लोत, माठभाजी, टाकले, तेर, चाईचे देठ, बाफली, कोहरेल, धोधडी, अळू या पालेभाज्या तर बांबूचे देठ, कंद, कडूकंद या कंदभाज्या पेंढार, अळू, काकड, भोकर, कर्टुले, करडू, टेटवी, आळीम या फळभाज्यांचा आहारात वापर केला जात असे. यामध्ये शेवली या भाजीला विशेष मागणी असून त्यांच्यातील खाजटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये काकड टाकली जातात. तर उंच डोंगर उतारावर आढळणाऱ्या बाफली रानभाजीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे त्यांची फळेही साठवून ठेवली जातात.कोवळ्या बांबूचा देठ त्यास ग्रामीण भाषेत ‘वास्ता’ असे संबोधले जात असून त्यापासून त्याला काप देऊन शिंद ही भाजी मिळविली जाते. त्याचा ग्रामीण भागात आजही बºयाच ठिकाणी वापर केला जातो.
परंतु आता बांबूची झाडे कमी झाल्याने शिंद बनविण्यासाठी जंगलातून लोक आता कोवळे बांबूचे देठ शोधून आणतात. कर्टुले या फळभाजीला ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातही मोठी मागणी आहे. तर कडूकंदापासून वली बनवतात त्या कडू असल्याने त्यांच्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी त्यामध्ये राखाडी टाकून त्या शिजविल्या जातात.