अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : तालुक्यातील सरावली गावच्या रमेश रामू धोडी (५०) यांनी शेतीत बटाटा लागवडीचा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे. या लागवडीला महिना झाला असून पीक चांगले बहरल्याने पुढील वर्षी नियोजनबद्धपणे पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.डहाणू-जव्हार मार्गावरील सरावलीतील मानफोड पाडा येथे रमेश रामू धोडी यांची दीड एकराची शेती आहे. खरिपात भात या पारंपरिक पिकाची ते लागवड करतात. त्यांची भिस्त मोगरा शेतीवर असून ५०० रोपांची बाग आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पहाटे कळ्यांची खुडणी झाल्यावर ते उत्पादन मुंबईतील बाजारपेठेत पाठवले जाते. त्यांची ही संपूर्ण शेती शेण, गांडूळ, गोमूत्र, पाला-पाचोळा अशा सेंद्रिय खतावरच केली जाते. याकरिता भाताची पावळी नजीकच्या दुग्ध व्यावसायिकाला देऊन त्या बदल्यात शेण घेतले जाते.
धोडी यांच्या एका उत्तर भारतीय मित्राने त्यांना बटाटा लागवडीचा प्रयोग सांगितला. त्यानंतर मित्रासह त्यांनी शहरातील भाजी मार्केटमधील बटाटा व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करून विक्रीस अयोग्य म्हणून बाजूला काढलेले बटाटे त्यांनी गोळा केले. ते घरी आणून त्यापैकी लागवडीयोग्य निवडून सेंद्रिय खतावर सावलीत तीन दिवस ठेवल्यानंतर गादी वाफ्यावर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याची लागवड केली. तालुक्यात बटाटा पीक घेतले जात नसल्याने, त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक जण त्यांच्या शेताला भेट देत आहेत.वडिलांकडून शेतीचे तंत्र शिकलो असून आजतागायत नोकरी केलेली नाही. मित्राने बटाटा लागवडीला प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले. हा प्रयोग यशस्वी झाला असून पुढील वर्षी व्यापारी तत्त्वावर बटाटा लागवड करण्याचा मानस आहे.’- रमेश रामू धोडी,शेतकरी सरावली/डहाणू