वाडा : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होणारी भातशेती आता परवडत नसल्याने याला पूरक असणारा पशुपालनाचा व्यवसाय पूर्णत: कमी झाल्याने तालुक्यातील जनावरांची संख्या रोडावली आहे. यामुळे पशुवैद्यकीय दवाखाने ओस पडले आहेत.
तालुक्यात वाडा, गोºहा, कुडूस, सोनाळे, मांडवा, परळी, पाली, मानवली, हमरापूर, पालसई, उज्जैनी, कंचाड, खानिवली, नेहरोली, अबिटघर, कोंढले असे जिल्हा परिषदेचे १५ आणि राज्य शासनाचा एक असे १६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. १३ पशुधन विकास अधिकारी कार्यरत असून तीन जागा रिक्त आहेत. त्यांना सहायक म्हणून १९ कर्मचारी आहेत. त्यापैकी आठ जागा रिक्त आहेत.१९ व्या पशुगणनेनुसार तालुक्यातील एकूण गायींची संख्या २२,८३३, म्हशी - ११,६४८, कोंबड्या- ८४,६०५, शेळ्या-मेंढ्या - १७,३७३ एवढे पशुधन आहे. पशुदवाखान्यांच्या माध्यमातून शासन जनावरांच्या विविध आजारांवर उपचार करणे, लसीकरण करणे आदी कामे करते. यासाठी शासन विविध योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करते. मात्र, दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होऊ लागल्याने योजनांची अंमलबजावणी करणे कठीण होते आहे.
पूर्वी शेतकरी शेतीसह पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हे पूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करत असत. दिवसागणिक वाढती महागाई, मजुरीचे वाढते दर आणि उत्पादित मालाला न मिळणारा बाजारभाव यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी भातशेती लागवड करण्याचे प्रमाण कमी केले आहे. यामुळे पशुपालनाचा व्यवसायही जवळजवळ संपुष्टात आला आहे. पूर्वी प्रत्येक शेतकºयाकडे किमान १० जनावरे असत. मात्र, आता जी काही लागवड होते ती यांत्रिक पद्धतीने होऊ लागल्याने जनावरे (गुरे) पाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.काही वर्षांपूवी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाºया जनावरांची संख्या मोठी असायची, त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कामाचा व्याप असे. आता जनावरांची संख्या कमी होऊ लागल्याने पशुवैद्यकीय दवाखाने ओस पडल्याचे दिसत आहे.तालुक्यात विविध योजना राबविल्या जात असून असलेल्या पशुधनापैकी कुडूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वेगवेगळ्या आजारावर दर महिन्याला ७०० पशूंवर उपचार केले जातात. - डॉ. शरद आस्वले, प्रभारी पशुधन विकास अधिकारी, वाडा