पारोळ : कोरोनासारख्या जागतिक विघ्नामुळे यंदाचे उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन शासकीय स्तरावरून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जन्माष्टमीचा सण साधेपणाने साजरा करण्यात आला. तर, वेगाने फैलावणाऱ्या कोरोनामुळे वसई-विरारमधील गोविंदा मंडळांनी अनेक दहीहंडी उत्सव रद्द केले होते. त्यामुळे गोविंदा पथकांच्या थरांचा थरथराट रंगलाच नाही. यामुळे गोविंदांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले.कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सणांवर अनेक बंधने आल्यामुळे आनंदच हिरावून घेतला गेला आहे. मानवी मनोरे रचून उंचचउंच दहीहंड्या फोडण्याचे कसब दहीहंडी उत्सवात पाहायला मिळते. मात्र, महामारीमुळे यंदा अनेक मंडळांनी हा सण नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काही ठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या. तर, बºयाच ठिकाणी गोविंदांनी श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून मडकी सजवून हा उत्सव साजरा केला.दहीहंडी फोडण्यासाठी दरवर्षी मुंबई, ठाण्यातील पथकेही हजेरी लावू लागली आहेत. यंदा मोठमोठे स्टेज, भव्यदिव्य लाइट शो, सेलिब्रिटी, आॅर्केस्ट्रा हे काहीच नसल्यामुळे सर्वत्र सामसूम होती.
थरांचा थरथराट रंगलाच नाही; वसई-विरारमध्ये गोविंदा साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:47 AM