तलवाडा : विक्रमगड ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या विशेष घटक योजनेतील तलावाची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झालेली असुन याकडे ग्रामपंचायतीचे व संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे़ या तलावाचे सुशोभीकरण करण्याची मागणी गेल्या १७ वर्षापासून विक्रमगडवासीय करीत आलेले आहेत. परंतु त्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़ यामुळे या तलावाचा उपयोग सध्या आजुबाजूच्या पाडयातील लोक शौचासाठी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे़ विक्रमगड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र-ड मधील पंतगेश्वर मंदिरा समोर गावाच्या पाण्याची विहीर असून त्या लगतच पुरातन मोठा तलाव आहे़ त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष असल्यामुळे तो वर्षानुवर्षे साफ होत नाही़ तलावाच्या आजुबाजूला सर्वत्र गवत उगवल्याने तलावाचे सौदर्य नष्ट झालेले आहे़ त्याठिकाणी तलाव आहे की नाही हेच समजत नाही़ या तलावात कचऱ्याची भर पडत असल्याने त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे़ एकदा आमदार निधीचा वापर करून विशेष घटक योजनेतून लाखो रुपये खर्च करुन या तलावातील घाण, गाळ, काढून तलाव स्वच्छ करुन संरक्षण भिंत व घाट बांधण्यापर्यतचे काम करण्यांत आले़ त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे़ तसेच बाहेरील व्यापारी, स्थानिक रहीवासी टाकत असलेल्या केरकचऱ्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे़ या तलावास कुणी वाली आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे़
विक्रमगडच्या तलावाची दुरवस्था
By admin | Published: February 06, 2016 2:00 AM