पालघर : विक्रमगडच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक संतोष घाणेकर हे कार्यालयातच दारू पिऊन पडून राहत असल्याची गंभीर घटना मागच्या आठवड्यात घडली. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कार्यालयात नेहमीच मद्यपान करून येत असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याने निलंबनाच्या कारवाईची मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात नागरीकरणाला वेग आला असून अनेक तालुक्यांत रहिवासी संकुले उभी राहत आहेत. या संकुलातील फ्लॅट, दुकानाचे गाळे, विक्री करार, पॉवर ऑफ ॲटर्नी, लीज डीड, गिफ्ट डीड आदींची नोंद करण्यासाठी तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालये उभारण्यात आली आहेत. विक्रमगड तालुक्यात विक्रमगड-डहाणू रस्त्यावरील एका इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थापन करण्यात आले असून प्रत्येक आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी अशा दोन दिवशी नोंदणी केली जाते. या कार्यालयातील वरिष्ठ क्लार्क घाणेकर यांच्याकडे प्रभारी उपनिबंधकाचा पदभार सोपविल्याची माहिती जिल्हा निबंधक एन.व्ही. पिंपळे यांनी ‘लोकमत’ला दिली. या कार्यालयात नोंदणीसाठी महिनाभराचा कालावधी लागत असल्याच्या तक्रारी असून कार्यालयीन वेळेत प्रभारी उपनिबंधक घाणेकर हे दारू पिऊन वावरत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
मागच्या आठवड्यात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रभारी उपनिबंधक घाणेकर हे दारू पिऊन कार्यालयात पडून राहिल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यांना हाताला पकडून काही लोकांनी एका रिक्षात बसवून विक्रमगडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यापूर्वीही दारू पिऊन आल्यानंतर त्यांना उपचारासाठी विक्रमगडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील अनेक महिन्यांपासून असे प्रकार सर्रास घडत असूनही दारूबाज उपनिबंधकाविरोधात कुठलीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अशा मद्यपी अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.- सुनील भुसारा, आमदारअशा कुठल्याही तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नसून अशी काही गंभीर घटना घडली असल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल.- एन.व्ही. पिंपळे, जिल्हा निबंधक, पालघर