राहुल वाडेकर विक्रमगड: कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास गोडीस, रुचकर व मागणी जास्त असलेल्या विक्रमगडच्या प्रसिध्द गावठी कोलम (झीनी) तांदळाची पूर्वीप्रमाणे लागवड होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ तो सध्या नामषेश होण्याच्या मार्गावर आहे़. कारण उत्पादीत मालाला कमी बाजारभाव, मजुरीचे वाढते दर, शेतीसाहित्याचा वाढलेल्या किंमती, महागाई आणि महत्वाचे म्हणजे निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील घेतल्या जाणाºया या लहान दाण्याच्या भाताचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे़ शेतकरी सध्या त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे एक चांगले वाण धोक्यात आले आहे़ सध्या हा तांदुळ बाजारात दुकानावर ५५ ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे़आजची तरुणाई शेतीबाबत उदासीन आहे. काही ठिकाणी नवनवीन सुधारीत जातीच्या वाणांची लागवड केली जात असल्याने या तांदळाचे उत्पादन घटले आहे. याच्या उत्पादनासाठी मेहनतीच्या जोडीला मोठा खर्च करावा लागतो. निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही, तर शेतकºयांच्या वाट्याला नुकसानच येते. या वाणाला कीड लवकर लागते व त्यापासून खूप जपावे लागते. तशी मेहनत घ्यावी लागते़ त्यामुळे या भातपिकाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे विक्रमगड येथील शेतकरी घनश्याम आळशी यांनी लोकमतला सांगितले.विक्रमगड तालुक्यातील मृदा, पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी विक्रमगड कोलम या भातपिकाचे मोठया प्रमाणात सर्वत्र शेतकºयांकडून उत्पादन घेतले जात होते. एक सेंटिमीटर लांबीचा असणारा शुभ्र दिसणारा तांदूळ आणि त्याला येणारा गोड सुगंध यामुळे हा तांदूळ खाण्यासाठी अतिशय रुचकर म्हणून ओळखला जातो. पूर्वी भात पिकाच्या मोजक्या जाती होत्या. त्यात कोलम तांदळाला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे या भात पिकाची कोठारे तालुक्यातील विविध भागातील आदिवासी व कुणबी शेतकरी कणग्यांमध्ये भरुन ठेवत असे. मात्र अलिकडे भात पिकांच्या संकरित व सुधारित जातींमुळे या पिकाची जात दुर्लक्षित होऊन आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जातीवरही कृषी विद्यापीठातून संशोधन होण्याची आवश्यकता आहे.
विक्रमगडचा गावठी कोलम होतोय नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 5:56 AM