विजय वल्लभवसई : शुक्रवारी पहाटे विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या १५ रुग्णांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला. याच दुर्घटनेत वसईतील कळंब गावच्या क्षमा अरुण म्हात्रे या महिलेला आपला प्राण गमवावा लागला आहे. दरम्यान, क्षमा म्हात्रेवर गेल्या एक महिन्यापासून कोरोनावर उपचार सुरू होते. ती अलीकडे बरीही झाली होती आणि शुक्रवारी सकाळी तिला घरी सोडण्यात येणार होते; परंतु शुक्रवारीच पहाटे अग्निकांडात तिचा करुण अंत झाला.
वसई तालुक्यातील मच्छीमारांचे गाव म्हणून कळंब हे गाव ओळखले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या गावातील क्षमा म्हात्रे ही पहिली रुग्ण ठरली होती. तिच्यावर विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात गेल्या एक महिन्यापासून उपचार सुरू होते. कोरोनामधून ती बरीही झाली होती आणि घटनेच्या सकाळी तिला रुग्णालयातून सोडण्यात येणार होते; परंतु दुर्दैवाने पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपळून तिने या जगाचाच निरोप घेतला. क्षमा म्हात्रे ही ४५ वर्षांची होती. तिला दोन मुली असून, त्यांचे मातृछत्र हरपले आहे. या घटनेने कळंब गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, कळंब गाव हे रेड झोनमध्ये येत असून, याठिकाणी दिवसाआड १/२ मृत्यू होत आहेत. गेल्या आठवडाभरात ७ ते ८ जण मृत्युमुखी पडले असतानाही याठिकाणी कुठेही सामाजिक अंतर पाळण्यात येत नाही. दुकानेही उघडी असून, मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावर जिल्हा व पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही मत व्यक्त होत आहे. या घटनेने कळंब गावावर शोककळा पसरली आहे.