- मंगेश कराळे नालासोपारा - श्री जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. देवाच्या भेटीला जाताना त्याच्या चरणाशी मृत्यू आला तर तो भाग्यवंत समजला जातो. असाच काहिसा प्रकार रविवारी जीवदानी देवी गडावर पाहायला मिळाला.
जीवदानी गडावर जीवदानी मंदिरात नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी अंधेरीच्या गुलमोहर रोडवरिल डुगरे चाळ येथील देविदास भवरलाल माली (४१) व त्याचा मित्र दुर्गाशंकर मनैरीया सोबत रविवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आला होता. पायथ्याशी असलेल्या गणेश मंदिरात दर्शन घेऊन तो पायऱ्यांच्या मार्गाने गड चढत असताना अर्ध्या वाटेवर देविदास याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यात त्याची शुद्ध हरपल्यानंतर इतर भाविकांच्या मदतीने त्याला गडावर नेऊन तिथून फर्निकयुलर ट्रेनद्वारे पायथ्याशी आणल्यानंतर रुग्णवाहिकेतून संजीवनी रुग्णालयात व नंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी रविवारी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
श्री जिवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा देवीच्या गडावर मृत्यू झाल्याने सर्वत्र हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे. मृत देवीदास याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा भाऊ गोपाळलाल माळी याच्याकडे अंतिम संस्कारासाठी मृतदेह देण्यात आल्यानंतर अंधेरी येथे सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.