विरार : बुधवारच्या मराठा बंदला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. विरार, नालासोपारा मध्ये मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मराठा समाजाने रस्त्यावर उतरून जी दुकाने चालू होती ती देखील बंद करणे भाग पाडले. नालासोपाऱ्यातील आचोळे रोड, तुळींज रोड येथे कार्यकर्त्यांनी ‘रस्ता रोको’ केला. ब्रीजच्या मध्यभागी थांबून त्यांनी दोन्ही बाजूने येणारी वाहने अडवीली. शाळा, कॉलेज व मेडिकल स्टोअर्स व रुग्णालये वगळता सारे काही बंद करण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. या रस्ता रोकोतून रुग्णवाहिका व शाळेच्या बसेस वगळण्याचा आदेश आंदोलनाच्या समन्वयकांनी दिला होता. सकाळी तो पाळला गेला परंतु दुपारी मात्र त्यांनाही बंद पाळणे भाग पाडले गेले. एसटी, रिक्षा व परिवहन बसेस देखील बंद केल्याने रेल्वेस्टेशन ला पोहचण्यासाठी चालत जाण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय नव्हता. कोणताही स्थानिक नेता किंवा आमदाराला आम्ही येथे आसपास फिरकू देणार नाही, आणि जर असा कुणी दिसला तर त्यांना आम्ही चोप देऊ असा इशारा आंदोलकांनी दिला होता. जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही अधिक आक्रमक होऊ असे एका महिला आंदोलकाने लोकमतशी बोलताना सांगितले. रिक्षा चालकांना देखील रिक्षा बंद ठेवा अन्यथा आम्हाला तोडफोड करावी लागेल असा इशारा दिल्याने रिक्षाही बंद होत्या.
विरार, नालासोपारामध्ये सक्तीने घडवून आणला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:42 PM