- मंगेश कराळे
नालासोपारा - सराईत आरोपीकडे सोमवारी दुपारी दोन लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर आणि गांजा असे अंमली पदार्थ सापडले आहे. विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी कामगिरी केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे.
विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे यांना एक आरोपी सोमवारी दुपारी कारगिल नगरच्या कालिका माता मंदिराजवळ ब्राऊन शुगर आणि गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
सदर बातमीचे आधारे मिळालेले बातमीची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेले आदेशान्वये लागलीच सदर ठिकाणी सापळा रचुन आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले. राहुल ओबांसे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीची अंगझडती घेतल्यावर त्याचे कब्जात १७ ग्रॅम वजनाचा १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा ब्राऊन शुगर नावाचा अंमली पदार्थ व १ किलो ५०० ग्रॅम वजनाचा ३० हजार रुपये किंमतीचा गांजा असा एकुण २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २१(ब), २०(ब) त्त्(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजित मडके व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, विशाल लोहार, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, योगेश नागरे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, प्रफुल सोनार यांनी केली आहे.