- मंगेश कराळेनालासोपारा - बलात्काराच्या गुन्ह्यात तब्बल २४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी मंगळवारी दिली आहे.
२१ मे २००१ साली वसईच्या एका गावात चुलत भावाच्या लग्नासाठी आलेल्या पीडित महिलेला पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ५ आरोपींनी शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आयुक्तालयामधील पोलीस ठाणे अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यासाठी सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे विरार गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी व अंमलदार यांना २४ वर्षापासून बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शांताराम वरटा (४९) हा नातेवाईकानां भेटण्यासाठी अधून मधून राहते गावी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपुस केल्यावर त्याने गुन्ह्याची कबूली देऊन तो मागील २४ वर्षापासुन स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता.
सदर गुन्ह्यात न्यायालयाने अटक केलेल्या इतर आरोपींना १९ नोव्हेंबर २००५ रोजी दोषी ठरवून बलात्कार या गुन्ह्यासाठी प्रत्येकी ५ वर्षे सक्त मजुरी व २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सक्त मजुरी तसेच कलम ३२३ मध्ये १ वर्ष साधी कैद, पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधी कैद ही शिक्षा दिलेली होती. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मिळून आल्याने त्याला १७ ऑगस्टला अटक करुन न्यायालयात हजर केले आहे. तसेच न्यायालयात सदर आरोपी विरुध्द न्यायहेतूसाठी लवकरच पुरवणी दोषारोप पत्र सादर करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशिलकुमार शिंदे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, भाऊ डूबे, सहा. फौज. विजय सूर्यवंशी, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेळके, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, प्रफुल सोनार यांनी केलेली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार ऑगस्ट महिन्यात विरार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार असलेल्या ६ आरोपींना अटक करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश मिळाले आहे.