वसई : शनिवार - रविवारी कोसळलेल्या पावसामुळे शहरातील गटारे, नाले ओसंडून वहात आहेत. या पावसाचा सर्वाधिक फटका विरारमधील बहुतांशी अनधिकृत चाळींना बसला आहे. विरार पूर्व रायपाडा परिसरातील अनिधकृत चाळींसाठी भूमाफियांनी बांधलेली एक भली मोठी संरक्षक भिंतच मंगळवारी एका चाळीवर कोसळल्याची घटना घडली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे वसईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका रायपाडा परिसरात नव्याने विकसित होणाºया अनधिकृत चाळींमधील रहिवाशांना बसला. नाले भरून वहात असून नाल्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहाने नाल्याच्या भिंतीचा ५०० फूट भाग हा एका चाळीवर कोसळला, तर काही भाग पाण्यात वाहून गेला. येथील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र पुराचे पाणी घरात शिरून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.पालिकेचे अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष ?ही अनधिकृत भिंत निकृष्ट दर्जाची तसेच कमकुवत असल्याने ती पुराच्या पाण्यात कोसळली. आजही वसई विरार शहर महापालिका हद्दीत अनेक अनिधकृत चाळींचे बांधकाम सुरू असून महापालिकेचे अधिकारी या बेकायदा बांधकामांकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करताना दिसतात.
विरारमध्ये अनधिकृत भिंत चाळींवर कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 11:29 PM