वसई : विरार शहराला लागून ग्रामीण भागातील पापडखिंड धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. पावसाळ्यात येथे तरुणांच्या हुल्लडबाजीला उत येऊ लागला आहे. शनिवार, रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशी काही तरुणाचे ग्रुप मद्यपान करून डोंगराच्या टोकावर चढून जात आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने डोंगरावरील दगडही कमकुवत होत असतात. त्यामुळे डोंगरावरून दरड कोसळून जीवावर बेतणारा अपघात होण्याची भीती अन्य उपस्थित पर्यटकांकडूनच व्यक्त होत आहे.पालघर, वसई हा पूर्व पश्चिम भाग बऱ्यापैकी निसर्गरम्य, हिरवेगार डोंगर, पाण्याचे ओहोळ अशा नानाविध कारणांनी पर्यटकांचे आकर्षण ठरला असून यापैकी उत्तम असे हे ठिकाण म्हणून विरार पूर्वेकडील पापडखिंडीकडे पाहिले जाते. कुठलाही लांब पल्ल्याचा प्रवास न करता अगदी विरार शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील हा एकमेव छोटा धरण धबधबा असल्याने स्थानिकांची येथे मोठी गर्दी होते आहे. सुट्टीच्या दिवशी अथवा पावसामुळे रेल्वे सेवा बंद असल्यास या धबधब्यावर वसई- विरारकरांची मोठी गर्दी दिसून येत असते.पाण्यात उतरू नये?पापडखिंड धरणाच्या पाण्यात गेल्या काही वर्षांत तरु णांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना काळजी म्हणून यंदा या धरणाच्या पाण्यात कोणीही तरुण अथवा पर्यटक पोहण्यासाठी उतरू नये यासाठी वसई महापालिकेने या भागात दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत.
विरारच्या पापडखिंड धबधब्यावर हुल्लडबाजी; सावधगिरी बाळगा, अन्यथा दुर्घटना अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:40 PM