वसई : विरार पूर्व भागात मागील अनेक वर्षांपासून तलाठी सजा विरार कार्यालय हे कार्यरत असून, हे कार्यालयच आता मोडकळीस आले आहे. वसईतील बहुतांश तलाठी कार्यालयांची दुरवस्था पाहिल्यानंतर, वसई-विरार येथील काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची महसूलमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन महसूल विभागाच्या उपसचिवांना ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या कार्यालयाचा कायापालट होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.विरार स्थित या तलाठी कार्यालयांतर्गत चंदनसार, चिखल डोंगरे, नारंगी, विरार पूर्व व पश्चिम, दहिसर परिसर येत असून, येथील नागरिकांची जागेच्या संदर्भातील उतारे, फेरफार, गाव नमुना, उत्पन्नाचे दाखले, तलाठी रिपोर्ट इ. कामे या तलाठी कार्यालयामार्फत होतात, तर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या कार्यालयात दररोज लोकं मोठ्या संख्येने येतात. मात्र, या कार्यालयाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झालेली होती. त्याच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नव्हते आणि अशाच दुरवस्था झालेल्या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी जिवावर उदार होऊन काम करत आहेत, तसेच महसूलच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही भीती असते. या कार्यालयात जाण्यासाठी असलेले प्रवेशद्वार उंचीने कमी असून, नागरिकांना वाकूनच आत जावे लागते. या कार्यालयाची अवस्था धोकादायक असल्याने एखादी दुर्घटना घडली, तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या कार्यालयामार्फत प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असूनही या कार्यालयाची दुरुस्ती का होत नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी याबाबत महसूल खात्याकडे तक्रारही केली होती. पावसाळ्यात ताडपत्रीचा आधारदरवर्षी पावसाळ्यात परिस्थिती बिकट होते. छपरातून पाणी गळती होत असल्याने, कार्यालयातील दस्तऐवज, शासकीय कागदपत्रे जपून ठेवण्यासाठी कर्मचारी, शिपाई वर्ग यांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागतो. या आणि वसई तालुक्यातील इतर कार्यालयांची नेमकी परिस्थिती व दुरवस्था जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी पाहून निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. आता महसूलमंत्र्यांनी महसूल विभागाच्या उपसचिवांना याबाबत ताबडतोब कारवाईचे आदेश दिल्याने, या कार्यालयाचा कायापालट कधी होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विरारच्या तलाठी कार्यालयाचा लवकरच होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:11 AM