बोर्डी : शासनातर्फे प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयां मध्ये विद्यार्थ्यांना फटाके न वाजवून प्रदूषण टाळण्याची सामूहिक शपथ दिली जात आहे.दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा आणि ध्वनी प्रदूषण होते. अनेकदा फटाक्यांमुळे अपघात घडून आग लागणे, शरीराचा अवयव भाजणे या मुळे एखादा अवयव कायमस्वरूपी गमावण्याची वेळ येते. प्राणी व पक्षांवरही दुष्परिणाम जाणवतो. या बाबतचे भान भावी नागरिकांना यावे आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी व्हावी या दृष्टीने हा उपक्र म राबविण्यात येत आहे.दरम्यान पर्यावरण संवर्धनाचा हा संदेश समाजात रुजावा या करिता विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती केली जात आहे.मंगळवारी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान अंतर्गत तालुक्यातील २६ केंद्रातील सुमारे पावणेपाचशे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा तसेच सर्व प्रकारच्या व माध्यमांच्या माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. सध्या सहामाही परीक्षेचे सत्र सुरु असल्याने परीक्षार्थींना सक्ती न करता या उपक्र मात सहभागी होऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प शपथेद्वारे केला जात आहे.
प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प, सामूहिक जागृतीची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:57 AM