बोर्डी : जगभरातील आकर्षक व देखणा अशी ख्याती असलेला पतंग बोर्डीनजीकच्या अस्वाली डॅम या परिसरातील पश्चिम घाटाच्या जंगलात पाहायला मिळाला आहे. त्यामुळे पर्यावरण आणि पक्षी निरीक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.भारतातलाच नव्हे तर जगभरातला सर्वात मोठा पतंग म्हणून त्याची ख्याती आहे. त्याने पंख उघडले असता साधारणपणे १० ते ११ इंच इतका भला मोठा त्याचा आकार होतो. बोर्डी गावातील निखिल चुरी या युवकाला फोटोग्राफीचा छंद आहे. वेगवेगळ्या हंगामात येणारे पक्षी व कीटकांचे फोटो काढण्यासाठी तो तासंतास पश्चिम घाटातील जंगल पालथे घालतो. गेल्या रविवारी बोर्डीपासून २० ते २५ किमी अंतरावरील अस्वाली डॅमच्या परिसरात या पतंगाचे दर्शन घडले. त्याने पंख उघडल्यावर त्याचा आकार सर्व साधारणपणे ४०० चौरस से मी (६२ चौरस इंच) इतका होतो. त्याने पाहिलेला पतंग त्या पेक्षा आकाराने थोडा लहान असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. त्याचे वरचे पंख अतिशय देखणे व आकर्षक असून ते गर्द मरून -तपकिरी रंगाचे होते. तर पंखावर हिरव्या-पोपटी रंगाची छोटी कडारेषा असून वरच्या दोन पंखावरील टोकाची नक्षी नीट बघितल्यास सापाच्या डोक्याचा आकार त्याला प्राप्त झाला होता. त्याच्या डोक्यावर दोन तुरे असल्याची माहिती निखिल यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या पतंगाचे विविध अँगलने अनेक फोटो त्याने काढले आहेत. हा आनंद त्यांनी कुटुंबीय, मित्र आणि कालिग यांच्यासह सोशल मीडियावर फोटो पाठवून शेअर केला असून अनेकांनी त्याला लाईक केले आहे.दरम्यान उत्सुकतेपोटी या बाबत त्याने इंटरनेटवर अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी या देखण्या पतंगाचे आयुष्य केवळ ९ ते १२ दिवस असल्याचे लक्षात आले. कारण प्रौढावस्थेत त्याला तोंड नसल्याने काहीही खाता येत नसल्याचे तो म्हणाला. या परिसरात हा पतंग आढळून आल्याने पक्षी व कीटक निरीक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. शिवाय लवकरच दिवाळीची सुट्टी येत असल्याने त्याच्या निरीक्षणाचा प्रत्यक्ष लाभही घेता येणार आहे. या परिसरात वर्षभर येथे गर्दी असते. डॅमच्या पायथ्याशी आदिवासींच्या झोपड्या आहेत. ग्र्रामपंचायतीने पर्यटनाच्या दृष्टीने स्थानिकांना सुविधा निर्माण करून दिल्यास रोजगार संधी मिळेल.या दुर्मिळ पतंगाच्या दर्शनाने जैवविविधतेच्या दृष्टीने हा परिसर किती साधन आहे याची प्रचिती आली. त्यामुळे पक्षी व किटक निरीक्षकांसाठी हि आनंदाची बाब आहे.- निखिल चुरी, फोटोग्राफर व पक्षी निरीक्षक
अस्वाली जंगलात दुर्मीळ पतंगाचे दर्शन , नैसर्गिक पर्यटनाची संधी, पक्षी निरीक्षणाला नवा आयाम, अभ्यासकांची होणार गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 5:45 AM