- शशी करपे ।माजी आमदार विवेक पंडित यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदासह पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. तसा मॅसेज पाठवून त्यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पंडितांच्या श्रमजीवी संघटनेने भाजपाला पाठिंबा जाहिर केल्याने त्यांची भाजपाशी जवळीक झाल्याचे लपून राहिलेले नाही.श्रमजीवी संघटनेचे नेते, माजी आमदार पंडित गेली अनेक वर्षे शिवसेनेचे उपनेते आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पंडित यांनी वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूरांच्या उमेदवाराला पराभूत करीत मोठा हादरा दिला होता. त्यामुळे पंडितांचे शिवसेनेत वजन वाढले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंडितांनी राजकारणाशी फारकत घेत आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत केले होते. शिवसेनेशीही त्यांचा दुरावा निर्माण झाला होता.खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून पंडितांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांशी पंडितांची जवळीक वाढत चालली असल्याचे दिसत होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी वसई विरार परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आपण माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी ऋणी आहे. आपले वैयक्तिक संबंध असेच राहू द्या ही पांडुरंगाकडे प्रार्थना, असा मॅसेज पंडितांनी पाठवल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोकमतने मागोवा घेतला असता पंडितांनी शिवसेनेचे उपनेतेपद आणि पक्ष सोडला असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली. याप्रकरणी पंडितांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे, पंडित संस्थापक अध्यक्ष असलेल्या श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यात होणाºया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा जाहिर केल्याची माहिती संघटनेच्या उपाध्यक्षा आणि पंडितांच्या कन्या आराध्य पंडित यांनी दिली. ते भाजपाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताला आधार मिळाला़मोठे स्थान मिळणार असल्याची चर्चापंडितांना भाजपात मोठे स्थान देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रियाच बदलली आहे. पूर्वी मंडळाचे अध्यक्षपदावर आदिवासी विकास मंत्री व उपाध्यक्षपदावर आदिवासी विकास राज्यमंत्री पदसिद्ध असत.नव्या धोरणानुसार आदिवासी समाजासाठी व्यापक योगदान दिलेल्या व्यक्तींना अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद दिले जाणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जाही देण्यात आला आहे. पंडितांना भाजपात सामावून घेण्यासाठी हा बदल करण्यात आला असून अध्यक्षपदावर पंडितांची वर्णी लावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विवेक पंडित भाजपामध्ये? उपनेतेपदासह शिवसेनेला सोडचिठ्ठी, पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:55 AM