नालासोपारा (मंगेश कराळे) - पुणे पोर्शे हिट अँड रन आणि मुंबईत कावेरी नाखवा यांचे प्रकरण ताजे असताना विरारमध्ये भरधाव कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासाट असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्या गोकुळ टाऊनशीप येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरून कामावरुन सुटल्यावर जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वेगाने धावणाऱ्या टोयाटो फोर्चूनर कारने त्यांना धडक दिली. कारच्या धडकेत डिव्हायडरवर आपटल्याने त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातास कारणीभुत ठरलेल्या कारचालकाने त्यांना नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा रात्री मृत्यू झाला. आत्मजा कासाट यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला असून कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव शुक्रवारी घरच्यांच्या स्वाधीन केले जाणार आहे. आत्मजा कासाट या विवा कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवत होत्या. त्या सामाजिक क्षेत्रात सक्रीय होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे.
अर्नाळा पोलिसांनी कारचालक तरुणाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याची माहिती अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी माहिती दिली आहे. शुभम प्रताप पाटील (२४) असे कार चालक तरुणाचे नाव असून तो विरार पूर्वेकडील परिसरात राहतो. कारचालकाने मद्यप्राशन केले असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच त्याने मद्यप्राशन केले आहे की नाही याची माहिती दिली जाईल असे सांगितले. कार चालकाच्या सोबत तरुणी कारमध्ये असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मात्र पोलिसांनी आरोपी एकटाच गाडी चालवत असल्याचे सांगितले.