वाडा : वाडा-भिवंडी या राज्य महामार्गावर प्रवास करणारे वाहन चालक आधीच त्रस्त असतांना आता हा महामार्ग ठिकठिकाणी खचू लागला आहे. त्यामुळे वाहनांचे अपघात वाढू लागले आहेत.
गेल्या तीन-चार दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने हा राज्य महामार्ग अनेक ठिकाणी खचला आहे. काल मंगळवारी या मार्गावर मुसारणे फाटा येथे प्रवासी वाहतूक करणारी एक गाडी खचलेल्या रस्त्यात आडवी झाली. सुदैवाने या गाडीत प्रवासी नव्हते.मात्र या गाडीचा चालक जखमी झाला. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम केले आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत असतात. गेल्या पाच वर्षात ७० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तर २०० हून अधिक जण जखमीझाले आहेत.
या रस्त्यावर दोन ठिकाणी टोल नाके असून मोठ्या प्रमाणात वाहन चालकांकडून टोल वसुली केला जातो. या टोल विरोधात रस्त्याच्या दुरवस्थेबाबत येथील सामाजिक संघटनांनी अनेक आंदोलने केलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त सुप्रीम कंपनीला असल्यामुळेच संबंधित कंपनीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.- जय शेलार,सामाजिक कार्यकर्ता