वाडा : नव्याने झालेल्या वाडा नगरपंचायतीचा निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र १८ ते २४ नोव्हेंबर या काळात संकेतस्थळावर ११ ते ३ या वेळेत भरावयाचे आहे. भरलेले आवेदनपत्र १८ ते २४ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयात स्वीकारले जातील, २५ नोव्हेंबरला छाननी होईल. ३० नोव्हेंबरही अर्ज मागे घेता येतील तर १३ डिसेंबरला मतदान होऊन १४ डिसेंबरला निकाल जाहीर होतील.वाडा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष हे पद हे महिला अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने या पदावर याआधी अनुसूचित जमाती वगळून सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होता. मात्र ते राखीव झाल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीत जागांमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण कमी झाल्याने इतर मागासवर्ग व खुल्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे अन्य समाजातील कार्यकर्त्यांना संधी वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांच्या आकांक्षा वाढल्या आहेत.ग्रामपंचायतकाळात सत्तेवर असलेल्या शिवसेना - भाजप दोन्ही पक्ष आत्ता मात्र स्वबळाचीच भाषा बोलत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी भारतीय जनता पक्षाला कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागत असे. त्यांना उमेदवारही मिळत नव्हते. परंतु आता परिस्थिती बदलली असून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाले आहे. तसेच पंचायत समितीपासून केंद्रसरकारपर्यंत भाजपचीच सत्ता असल्याने आता भाजपकडे कार्यकर्त्यांचा भरणा वाढला आहे. त्यामुळे इच्छूकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. एकंदर या बदलत्या राजकीय परिस्थितीत उमेदवारी वरून भाजपची डोकेदुखीही वाढली आहे.शिवसेनेचे वाडा शहरावर आजवर कायम वर्चस्व सिध्द झाले आहे. वाडे शहरामध्ये शिवसेनेला मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी जागानिहाय मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून कॉँग्रेस पुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे.आरक्षण बदलल्याने अन्य समाजाचे प्रतिनिधित्व वाढले आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे इच्छूक वाढले आहेत. या दोन्ही पक्षात जागा वाटपावरून बिनसण्याची चिन्हे आहेत. ग्रामपंचायतीत महत्वाची भूमिका बजावणाºया बहुजन विकास आघाडीनेही काही जागावर आपले उमेदवार जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. तर मनसेही मोर्चेबांधणीला लागली आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी गणेशोत्सवातच निवडक मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला होता.
वाडा नगरपंचायत निवडणूक अखेर घोषित; आजवर सत्ताधारी असलेली युती संपली; शिवसेना, भाजपा स्वबळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 4:12 AM