मुरबाड : तालुक्यातील वडाचापाडा या छोट्याशा खेडेगावातील प्रियंका इसामे या तरु णीने बालवयात डॉक्टर होण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यात ती यशस्वी झाली आहे. प्रियंकाने जिद्दीने मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे.
मुरबाड-माळशेज या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या व मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेल्या वडाचापाडा या खेडेगावातील किसन इसामे यांना गायन, संगीत व साहित्यिक वसा लाभल्याने त्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा फायदा हा समाजातील वंचित घटकांना मिळावा म्हणून आदिवासी आश्रमशाळेत तुटपुंज्या पगारावर शिक्षकाची नोकरी पत्करली. त्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ लागावी म्हणून ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. यातून जे मानसिक समाधान मिळते, ते इतर नोकरीत मिळत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. आपण या आदिवासी मुलांना घडविण्यात कुठेतरी कमी पडत आहोत म्हणून त्यांनी आपली उच्चशिक्षित पत्नी वनीता हिलाही आश्रमशाळेत शिक्षिका म्हणून रु जू करून घेतले.दरम्यान, आपल्या आईवडिलांसोबत बोट पकडून शाळेत जात असताना प्रियंका हिला बालवयातच आदिवासी मुलांच्या परिस्थितीची जाणीव झाली. त्यांचे आईवडील हे फाटक्या कपड्यात आपल्या मुलांना शाळेत आणत असताना त्यांंना मदत कशी करता येईल, त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांची सेवा कशी करता येईल, यासाठी तिने बालवयातच डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले.दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने विज्ञान विषय घेऊन बारावीमध्ये चांगले यश संपादन केले.वडिलांनी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेरूळ येथील डी.वाय. पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएससाठी प्रवेश घेतला. ही पदवी प्राप्त करण्यात यशस्वी होऊन या पदवीचा दीक्षान्त सोहळा कुलगुरू डॉ. विजय डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला असता प्रियंकाचा एक आगळावेगळा सन्मान करण्यात आला.आरोग्यासाठी तत्परआपण या पदवीच्या व्यवसायासाठी वापर न करता आईवडील ज्याप्रमाणे आदिवासींचा शैक्षणिक विकास होण्यासाठी झटत आहेत, त्याप्रमाणे मी त्यांच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर राहून विनामूल्य सेवा करीन, असे प्रियंकाने ‘लोकमत’ला सांगितले.