वसई : आपल्याच हॉटेल मालकाच्या घरात दरोडा टाकून सुमारे दहा लाख रुपयांची लूट करुन पुन्हा साळसूदपणे कामावर हजर झालेल्या वेटरला त्याच्या त्याच्या तीन साथीदारांसह माणिकपूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ४ लाख २० हजार रुपयांचा ऐवज आणि रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.माणिकपूर शहरात सदानंद पानीकर यांचे रॅम्बो नावाचे हॉटेल आहे. २३ जानेवारीला पनीकर यांच्या बऱ्हामपूर परिसरातील एन.एस.पॅलेस या बंगल्यामध्ये चोरट्यांनी खिडकीची ग्रील उचकटून व वाकवून आत प्रवेश करुन सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, मनगटी घड्याळ असा सुमारे १० लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मागर्दशनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार धुमाळ यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली होती. धुमाळ यांनी सर्वप्रथम हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चौकशी केली असता वेटर राजेश शाही याच्यावर पोलीसांना संशय आला. त्यानंतर गुप्तपणे राजेशची चौकशी करण्यास सुरुवात केली असता तो हॉटेलमध्ये पूर्वी काम केलेल्या मॅनेजर रामेश शाही याच्या संपर्कात असल्याचे पोलीसांच्या निर्दशनास आले. रमेश शाही याची अधिक चौकशी करता तो पुणे येथे असल्याचे पोलीसांना समजले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय धुमाळ यांनी तात्काळ आपल्या पथकासह पुणे-चिंचवड येथे जाऊन रमेश मोती उर्फ बहादूर शाही (वय २३), गणेश विष्णू शाही (वय ३२) व हिमाल मनबहादुर शाही (वय २०) या अटक करुन वसईला आणले. चौथा आरोपी हॉटेलचा वेटर राजेश उर्फ राजू मनबहादूर शाही याला वसईतून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलीसांनी चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्यांच्याकडून रिव्हॉल्वर, तसेच दरोड्यात वापरलेली अवजारे जप्त केली आहे. (प्रतिनिधी)
वेटरला ३ साथीदारांसह दरोडाप्रकरणी अटक
By admin | Published: February 02, 2016 1:46 AM