सुनील घरतलोकमत न्यूज नेटवर्क पारोळ : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आता रुग्णवाहिकाही कमी पडू लागल्या आहेत. १०८ रुग्णवाहिका आज कोरोना रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरत असून आधी ९ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यात होत्या, मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने २९ रुग्णवाहिका पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या सेवेत आहेत.पालघर जिल्हा हा सागरी, नागरी, डोंगरी भागात विभागल्याने एका रुग्णवाहिकेला किमान चार ते पाच कॉल येतात, पण रुग्णाचे घर व कोविड सेंटर यांचे अंतर जास्त असल्याने दुसऱ्या कॉलला वेळ लागतो, तर काही दवाखान्यांत बेड उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी चार ते पाच तास लागत असल्याचे रुग्णवाहिका अधिकारी अमित वाडे यांनी सांगितले.वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ हजारांहून अधिक झाला आहे. एकूण ९६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातही यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. येथेदेखील आतापर्यंत १५७२ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या वसई-विरारमध्ये रस्त्यावरून धावणाऱ्या अॅम्बुलन्समुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तर दर पाच-दहा मिनिटाला अॅम्बुलन्स धावत असल्याने सायरनच्या आवाजाने महामार्गालगत असलेल्या गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काॅल केल्यानंतर अर्ध्या तासांत रुग्णवाहिका हजर१०८ रुग्णवाहिकेसाठी रुग्णाच्या नातेवाईकांकडून काॅल केल्यानंतर रुग्णवाहिका किमान अर्ध्या तासात हजर होते. मात्र, पालघर जिल्हा हा शहरी, नागरी आणि डोंगरी स्वरूपाचा असल्यामुळे काही ठिकाणी पोहोचण्यास विलंब लागतो तसेच दुसऱ्या काॅलला जाण्यासाठी विलंब लागत असल्याचे ॲम्ब्युलन्सचे व्यवस्थापन करणाऱ्या अमित वाडे यांनी सांगितले.कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिक बेचैन आहेत. जागतिक महामारी म्हणून कोरोनाने मार्च महिन्यात भारतात प्रवेश केला. एप्रिल महिन्यात वसई तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे.सध्या ४३ हजारांच्या घरात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे तर ९६० जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण भयंकर वाढत आहेत.