हुसेन मेमन, जव्हारतालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे.दरवर्षा प्रमाणे जव्हार तालुक्यात ६ ते ७ जून च्या दरम्यान पावसाने आगमन होते. त्यामुळे शेतकरी यापूर्वीच जमीनीची नांगरणी, मशागत, खते, बी-बियाणे इत्यादीची खरेदी करून पूर्ण तयारीत असतो, मात्र निर्सगाच्या लहरीपणामुळे यंदा पाऊस जून संपत आला तरी पुरेसा पडलेला नाही त्यामुळे यंदा शेती होणार की नाही? असा प्रश्न पडला आहे. बहुतांश शेतकरी छोट्याखानी आपल्याला पुरेल इतकेच भात व नागली पिक घेत असतात आणि त्याच पिकात वर्षभर आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करीत असतात, परंतू पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातून भाताचे बियाणे खरेदी करावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्हयातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांची पावसा अभावी चिंता वाढत चाललेली आहे. वेळीच पाऊस पडत पसल्यामुळे पेरण्या लाब्ांणीवर जाणार आणि याचा दुष्परीणाम पिक काढते वेळी पडणार आहे, म्हणून शेतीची लागवड करावयाची की नाही? असा गंभीर प्रश्न छोट्या शेतकऱ्यांना पडला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदी करून ठेवलेले आहेत, परंतू पाऊस नसल्यामुळे बियाणे पडूनच आहे, महिन्या दोन महिन्यापूर्वीच भाव कमी असतांना खरेदी केलेले बियाणे इतक्या उशीरापर्यंत टिकेल की नाही अशीही शंका शेतकऱ्यांना सतावते आहे, त्यामुळे खरेदी केलेले बियाणे फुकट जाते की काय? आणि पुन्हा बियाणे खरेदी करतांना बाजारभाव चढलेला असेल तर तोही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे.
जव्हारला पावसाची प्रतिक्षा
By admin | Published: June 23, 2016 2:51 AM