वसई : हरी तोमर या फेरीवाल्याला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आरपीएफचा हवालदार दिनेश स्वामी याच्याविरोधात वसई रेल्वे पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी स्वामीला अटक करण्यात आली. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या हरी तोमर या फेरीवाल्याला आरपीएफचा हवालदार दिनेश स्वामी याने कोठडीत बेकायदेशीर डांबून अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणी हरी तोमर याने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मारहाणीनंतर तब्बल तीन दिवसांनी स्वामी याच्याविरोधात रेल्वे पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवल्यानंतर रेल्वे पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी स्वामीला अटक केली. दरम्यान, आरपीएफचे पोलीस फेरीवाल्यांकडून बळजबरीने हप्ता वसूली करतात. हप्ता न देणाऱ्यांना मारहाण करतात. अशी तक्रार तोमर याने केली आहे. हप्ता न दिल्याचा राग मनात धरूनच स्वामीने दारुच्या नशेत पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तोमर याची तक्रार आहे. तोमर याच्या तक्रारीवरून फेरीवाल्यांशी आरपीएफशी असलेली हप्ता वसुली चव्हाट्यावर आली आहे.वसई, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्टेशन आणि परिसर फेरीवाल्यांना व्यापून गेला आहे. रेल्वे स्टेशनच्या चोहोबाजूंनी फेरीवाल्यांनी गराडा घातला असल्याने प्रवाशांना रेल्वे स्टेशनमध्ये ये-जा करणेही अवघड होऊन बसले आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म, रेल्वे पूलसह विरार येथील सबवे मध्येही फेरीवाल्यांनी बाजार मांडलेला असतो. त्यामुळे प्रवाशांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असतो. पण, तक्रार करूनही रेल्वे प्रशासन कोणतीच कारवाई करीत नाही. तोमरच्या आरोपानंतर यामागचे गुपीत उघड झाले आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ रेल्वे पोलिसाला अटक
By admin | Published: March 05, 2017 2:29 AM