सुरेश काटे । लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसाने तलासरी नाक्यावरील दुकानात व घरात पाणी घुसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले, या वेळी तलासरी नाक्यावरील भारतीय स्टेट बँक, तसेच ए टी एम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय यातही दोन फुटा पर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे स्टेट बँकेची महत्वाची कागद पत्रे, संगणक, सोफे, फर्निचर, इत्यादी भिजून नुकसान झाले, बँकेच्या स्ट्राँग रुम मध्येही पाणी शिरले पण सुदैवाने नोटा वरच्या कप्यात असल्याने भिजल्या नाहीत, मंगळवारी तीन दिवसांची सुट्टी संपल्यावर बँका उघडल्यावर ग्राहकांच्या रांगा बँका समोर लागल्या पण सर्वच पाण्याने भिजून बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना कामकाज सुरू करता आले नाही पण ग्राहकांची गैरसोय होऊ नये या साठी एक दोन संगणक सुरू करून पैशाची देवाण घेवाण सुरू करण्यात आली, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात पाणी शिरल्याने त्याचे दप्तर भिजून गेले तलासरी नाक्यावरून वाहणाऱ्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे शासकीय आशीर्वादाने करण्यात आली आहेत.नाल्याचा प्रवाह अडविण्यात आला आहे त्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे पाणी तुंबून तलासरी नाका परिसर पाण्याखाली जातो. दर वर्षाची ही रड आहे. परंतु ही बांधकामे हटविण्याची कारवाई ना तलासरी नगर पंचायत करते , ना तलासरी महसूल विभाग करतो त्यामुळे नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे , एन एच ए व आय आर बी च्या अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधाने तलासरी उड्डाण पुला खाली व महामार्गाच्या गटारी वर बेकायदा टपर्या बांधण्यात आल्या आहेत.या टपऱ्या एन एच ए चे अधिकारी हटवित नाहीत व तलासरी महसूल विभाग व नगर पंचायत हद्दीचा प्रश्न उपस्थित करून काखा वर करीत आहे, आर्थिक हित संबंधाने शासकीय यंत्रणा मुर्दाड झाली असल्याने संतापलेले नागरिक आता रास्ता रोको करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
नाल्यावरील अवैध बांधकामांमुळे घुसले पाणी
By admin | Published: June 28, 2017 3:10 AM