- हुसेन मेमन
जव्हार- पालघर जिल्ह्यातील दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या मृत्यूमुळे लागलेली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झालेली असताना जव्हार तालुक्यात दारकोपरा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असून तीन दिवसांनी टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्यायला नाही पाणी, तर मतदान कशाला? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. पाण्याचा टँकर आल्यावर तर विहिरीवर महिलांची झुंबडच होते पूर्ण गावच्या गाव पाणी भरण्यासाठी विहिरीवर तुटून पडतात आणि काही मिनिटातच पाणी संपते अशा परिस्थिती मतदार मतदान द्यायचे की पाणी भरायचे, मतदान देऊनही निवडून आलेले खासदार आजतागायत आमची पण्यायाची समस्या सोडवू शकला नाही तर मतदानच का करायचे असा संतप्त सवाल येथील आदिवासी बांधव करीत आहेत. दादरकोपरा गावात ११८ कुटुंब राहत असून मागील वर्षापेक्षा या वर्षी पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावात दोन दिवसाआड टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने मे महिना कसा घालवायचा आणि जून महिन्याच्या सुरवातीला तर मोठी पाणी टंचाई होईल असाही प्रश्न महिलावर्ग व ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे आम्हला मतदानापेक्षा पाणी महत्वाचं असल्याचे महिलांनी सांगितले.दादरकोपरा गावाजवळील विहिरींनी तळ गाठला असून, एक हाफसा बोअरिंग आहे. मात्र या हाफसा बोअरिंगवर पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र करून नंबर लावावे लागत आहेत. तर याच गावातील दुस-या विहिरीवरील झिरपणारे पाणी खरतडून भरावे लागत आहे. तसेच या भीषण पाणीटंचाईमुळे गाई, गुरांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल झाले आहेत. म्हणून येथील शेतकऱ्यांनी गाई, गुरे, म्हशी अशी जनावरे नदीकाठी जंगलात हाकलून दिले आहेत. त्यामुळे येथील गुरा ढोरांचे करायचे काय असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यातच कधीकाळी टँकरचा पंचर किव्हा बिघाड झाल्यास चार दिवसाआड टँकर येत असल्याने पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. या गावातील ज्या विहिरीवर टँकर पाणी टाकते. त्या विहिरीवर महिला उभ्या राहून पाणी भरतात ती विहीर पूर्णपणे कोरडी आहे. पाणी भरण्यासाठी महिला, पुरुष, आणि मुलांनाही पाणी भरण्यासाठी झुंबड करावी लागत आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वाद देखील निर्माण होत आहेत. तसेच एखादी महिला विहिरीच्या पाळीवरून कोरड्या विहीरीत पडण्याची भीती महिलांना आहे. धोका पत्करून महिलांना पाणी भरावे लागत आहे. आमच्या गावातील ही दरवर्षीची पाणी टंचाई आहे. मात्र या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच टँकरही तीन दिवसांनी येत असल्याने पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. म्हणून आम्हला त्या मतदानापेक्षा पाणी महत्वाचं आहे. तसेच आम्ही अनेक वेळा निवेदने देवनही पाणी मिळत नाही.