वसई : या शहराच्या एका टोकाला असलेले दहा-बारा हजार लोकवस्तीचे कामण गाव सध्या पाणी टंचाईने त्रस्त झाले आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने गावकरी विहीरी आणि बोअरवेलच्या पाण्यावर विसंबून आहेत. पण, कडक उन्हाने पाणी टंचाईने उग्र स्वरुप धारण केले आहे. त्याचा फटका गावाशेजारील किमान १५ आदिवासी पाड्यांना बसला आहे. त्यांची तहान भागवण्यासाठी शिवसेना नगरसेविकेने कामण नदीच्या कोरड्यापात्रात तीन ठिकाणी खोल खड्डे खोदून त्यातील पाणी आदीवासींना उपलब्ध करून दिले आहे. मुंबई-अहमदाबाद हायवे पलिकडे दहा-बारा हजार लोकवस्तीचे कामण गाव वसले आहे. गावात १० सरकारी, २५ खाजगी विहीरी आहेत. तर २० सरकारी आणि किमान शंभरच्या घरात बोअरवेल आहेत. त्यात बाराही महिने पाणी असलेल्या कामण नदीमुळे गावाला पाणी टंचाई अशी कधी जाणवलीच नाही. पण, गेल्या पंचवीस वर्षांत या परिसरात शेकडो तबेले झाले. नदी जवळ असल्याने जमिनीत मुबलक पाणीसाठा. त्यामुळे एकेका तबेला मालकांनी चार-पाच बोअरवेल मारून जमिनीतील पाण्याचा बेसुमार उपसा केला. पंचवीस वर्षांनंतर आता कामण गावाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. कामण नदी असल्याने गावात विहीरी आणि बोअरवेल असल्याने मुबलक पाणी मिळत होते. तरीही १९८४ साली जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने विहीरी खोदून नळाद्वारे पाणी पुरवठा योजना राबवली होती. पण, देखभाल-दुरुस्ती अभावी ही योजना पाच वर्षांपासून बंद पडली आहे. कामण परिसरात डोंगरदऱ्या आहेत. त्यामुळे १९७२ साली ११ हेक्टर परिसराच्या पाझर तलावाचे भूमीपूजनही करण्यात आले. पण, वनखात्याने आडकाठी आणल्याने पाझर तलाव प्रकल्पाचे काम सुरु होऊ शकले नाही. आता कामण गावात पाणी टंचाईने उग्र स्वरुप धारण केले आहे. तबेल्यांकडून बेसुमार उपसा झाल्याने जमिनीतील पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे. तबेल्याधारकांनी दीड हजार फूटापर्यंतच्या बोअरिंग मारून ठेवल्या आहेत. आता गावकरी पाचशे फूटाहून खोल जात असूनही पाणी लागत नाही, अशी व्यथा माजी सरपंच दिनेश म्हात्रे बोलून दाखवतात. म्हात्रे यांच्या पत्नी प्रीती म्हात्रे सध्या नगरसेविका आहेत. त्यांच्या माध्यमातून कामण परिसरात पालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा सुुरु करण्यात आला होता. तो ही अपुरा होता. (वार्ताहर)कामण परिसरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. मागणी करुनही पालिका बोअर खोदून देत नाही. मोजक्या टँकरवर तहान भागत नाही. त्यामुळे कामणची पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी ठोस कार्यवाही झाली पाहिजे. त्यासाठी सोमवारपासून आंदोलन छेडणार आहोत.- प्रीती दिनेश म्हात्रे, शिवसेना नगरसेविकाअखेर भागली आदिवासींची तहान- प्रीती म्हात्रे यांनी पालिकेकडे २० बोअरची मागणी केली होती. पण, पालिकेने त्या ऐवजी टँकरने पाणीपुरवठा सुरु केला आहे. पण, तोही अपुरा पडत असल्याने लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामध्ये आदिवासींचे होणारे हाल पाहून प्रीती आणि दिनेश म्हात्रे यांनी एक नामी शक्कल लढवली. कामण नदीच्या पात्रात खोल खड्डे खोदण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पालिकेने मदत नाकारल्यानंतर म्हात्रे दाम्पत्याने स्वत: जेसीबी मागवून १२ फूट रुंद आणि १० फूट खोल असे नदीत तीन खड्डे खोदले. विशेष म्हणजे या तीनही खड्ड्यांमध्ये पाण्याचा साठा मिळाला. त्यामुळे आता येथील आदिवासींना किमान पिण्यासाठी पाणी मिळू लागले आहे.
आदिवासींसाठी जलमित्रांनी खोदले नदीत खड्डे
By admin | Published: June 05, 2016 2:56 AM