राहुल वाडेकर विक्रमगड : पूर्वीचा ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सहा वर्षांपूर्वी नव्याने पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा उद्धार व्हावा व नागरिकांना पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाने आदिवासी उपयोजनेतून येथील पाणी स्रोतांच्या आधारावर मोठी धरणे प्रस्तावित केली व ती धरणे सिंचनासाठी अस्तित्वात आणली असली तरी आजही जिल्ह्यात धरणे असूनही जिल्हावासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, ही शोकांतिकाच आहे.
जिल्ह्यातील धरणांचे पाणी इतरत्र वळवून धरणांशेजारील गावे आजही पाण्यापासून उपेक्षितच आहेत. साधे पिण्याचे पाणीही या धरणांलगतच्या गावांना मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. डहाणू तालुक्यातील चंद्रनगर व हनुमाननगर ही पुनर्वसित गावे, पोफरण अक्करपटी याचे जिवंत उदाहरण म्हणता येईल.
याच बरोबरीने कवडास व धामणी धरण अंतर्गत असलेल्या सूर्या प्रकल्पातून जिल्ह्याच्या डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्यात कृषी सिंचनाचे मूळ उद्दिष्ट समोर ठेवून शासनाने सूर्या प्रकल्प अस्तित्वात आणला असला तरी या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवून येथील शेतकऱ्यांची घोर निराशा सरकारने चालवली आहे. हजारो दशलक्ष घनलीटर पाणी दररोज वसई-विरार, मीरा-भाईंदर व मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाला देऊन येथील शेती सिंचनातून बाद केली असल्याचा आरोप केला जात आहे.