सुनील घरत
पारोळ : मार्च महिन्याच्या प्रारंभीच वसई-विरारचा पारा ३७ अंशांवर पोहोचला असून वसईच्या पूर्वेकडील ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक खेड्यापाड्यांत पाणीटंचाईची समस्या दरवर्षी निर्माण होते. आता ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिला व घरातील सदस्यांची पायपीट सुरू झाली आहे. तर विहिरींची पाणी पातळी खाली गेल्याने महिलांना पाणी काढण्यासाठी जीवाशी खेळ करावा लागत आहे.
उन्हाळा सुरू झाला की, वसई पूर्वेकडील गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. वसई तालुक्यातील खेड्यापाड्यात मुख्यतः पूर्वेकडील भागात नागरिकांना विहिरी, तलाव आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मार्चच्या सुरुवातीलाच या भागातील विहिरी आटू लागल्याने भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वसई पूर्वेकडील काही भागात व गावखेड्यांत पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी येथील महिलांना वणवण करावी लागत आहे. खड्डे मारून झिरपणाऱ्या पाण्यावर येथील नागरिकांना अवलंबून राहावे लागते. गावांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येथील गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार होता. परंतु अजूनही त्याचे काम रखडले आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
येथील नागरिकांना बोअरवेल, विहिरी, तलाव येथील पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. पाण्याचे स्रोत योग्य पद्धतीने जतन होत नसल्याने तेदेखील आता बंद पडू लागले आहेत. त्यामुळे अनेक विहिरी, तलाव यांची पातळी खालावली असून काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वसई-विरार महापालिका पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते तरीही समस्या सुटत नाही. कर भरूनही करदाते तहानलेलेच आहेत. मग कर का भरायचा, असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर घोटभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर येण्याची शक्यता आहे.