वसंत भोईर ।वाडा : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आदिवासी भागात रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा सरकार देऊ शकलेले नाही. गाव- पाड्यात जायला धड रस्ता नाही, वीज काही भागांत पोहचली असली तरी रात्री मिणमिणत्या उजेडात महिलांना स्वयंपाक व विद्यार्थांना अभ्यास करावा लागतो. तर पाणी टंचाई ही दरवर्षी प्रमाणे आताही आहे. पाणी टंचाई ही आमच्या पाचवीलाच पुजलेली असल्याच्या भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केल्या.तालुक्यातील पूर्व पट्टयातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ओगदा ही ग्रामपंचायत असून तिच्या अखत्यारित ओगदा, फणसपाडा, पाचघर, खोडदा व तिळमाळ ही पाच महसुली गावे असून चौदा पाडे आहेत. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २७७२ इतकी आहे. शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेली ही ग्रामपंचायत आहे. हा भाग अतिदुर्गम असल्याने प्रशासनाचे फारसे लक्ष येथे नाही असा आरोप आदिवासी नागरिक करीत आहेत. त्यामुळे मुलभूत सुविधांपासून ही ग्रामपंचायत वंचित आहे. ताडमाळ आणि मुहमाळ या पाड्यात जायला आजही रस्ता नाही. पायवाट व डोंगर चढून या पाड्यात जावे लागते. या पाड्याची १५० ते १७५ लोकसंख्या असून त्यांना जिकीरीचे जीवन जगावे लागत आहे. या गावातील नागरिक आजही खड्ड्यातील पाणी पित आहेत. येथे टंचाई जाणवत आहे. मात्र, टॅकरला जायला रस्ता नसल्याने प्रशासन येथे काहीच करू शकत नाही. बैलगाडीने येथे पाणी पुरवठा केला जातो.या ग्रामपंचायतीच्या पूर्वेकडील टोकरेपाडा, दिवेपाडा, सागमाळ व जांभुळपाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात असलेल्या विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरवर्षी मार्च महिन्यापासूनच येथे टंचाई जाणवायला सुरु वात होते असे येथील महिला माया दोडे यांनी सांगितले. सकाळ संध्याकाळ येथील नागरिक अंघोळ व महिला कपडे धुण्यासाठी एक किमी अंतरावर असलेल्या नदीवर जातात अशी माहिती ग्रामस्थ बबन दोडे यांनी दिली. पाणी टंचाईची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने एक टॅकर दोन ते तीन दिवसाआड चालू केले. एक दिवशी सागमाळ, टोकरेपाडा तर दुसऱ्या जांभुळपाडा असे टॅकर टाकले जाते. असे दोडे यांनी सांगितले. ओगदातील गावे ही वैतरणा जलप्रकल्प क्षेत्रात येत असून या गावाशेजारीच वैतरणा धरण होणार आहे. त्याचे सर्वेक्षण झाले असून ही गावे विस्थापित होणार आहेत. त्यामुळे त्यांना एखादी योजना घ्यायची असल्यास या धरणाची बाब पुढे येते व त्यांच्या योजना बारगळतात असे ग्रामस्थांनी सांगितले.
पाणीटंचाई आमच्या पाचवीलाच पुजलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 2:35 AM