सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळ्यासह १७ गावांमधील अनेक नळजोडणीधारकांना पाणीपुरवठा होत असतानाही पाणीदेयके भरलेली नाहीत. त्यामुळे सफाळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या विजेचे बिल भरू न शकल्यामुळे तीन दिवसांपासून या गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. थकबाकीदार ग्राहकांमुळे प्रामाणिकपणे पाणीबिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत असून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Water supply to 17 villages closed due to non-payment of electricity bills) सफाळेसह येथे एकूण १७ गावे व अनेक पाडे असून तेथे २५ हजारांहून अधिक कुटुंबे आहेत. या ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजे चार हजारहून अधिक नळजोडण्या आहेत. परंतु येथील बहुसंख्य जोडणीधारक ग्रामपंचायतीला पाण्याची देयके भरत नसल्याने थकबाकी वाढली आहे. अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाने ग्राहकांना याबाबत सूचना व नोटीस दिल्या. मात्र तरीही थकबाकीदार ग्रामस्थ पाणी देयके भरत नसल्याने सफाळे ग्रामपंचायत वीजबिल भरू शकली नाही. थकीत वीजबिल न भरल्याने पाणी योजनेचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. थकीत रक्कम भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू करता येणार नाही, अशी नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे आता सर्वच नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. सफाळे ग्रामपंचायतीने वीजबिल भरून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अशी आहे योजना या १७ गाव पाणी योजनेचा प्रारंभ सन २००९ मध्ये करण्यात आला. करवाने धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. त्यात उंबरपाडा, सफाळे, कर्दळ, माकणे, मांडे, विराथन बुद्रूक, जलसार, टेंभी खोडावे, मांजुर्ली, करवाले, नवघर, कांदळवन, वैतीपाडा या गावांचा समावेश आहे. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जि.प. सदस्य, अन्य पदाधिकारी म्हणून पं.स. सदस्य समाविष्ट आहेत.
१७ गावांचा पाणीपुरवठा वीजबिल न भरल्याने बंद, प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्यांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 8:55 AM