वसई - दोन दिवस जोरदार पडणाऱ्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील सूर्या धरणाची पंपिंग स्टेशनची वीज केबल नादुरुस्त झाल्याने वसई विरार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत मागील दोन दिवसांपासून बऱ्यापैकी विस्कळित झाला आहे, त्यामुळे दुरुस्तीसाठी शहराचा पाणीपुरवठा बंद असल्याने सदरचे काम व पाणीपुरवठा सुरळीत होण्यास किमान दोन दिवस तरी लागणार असून हा पाणीपुरवठा शहराच्या भागात टप्याटप्याने सुरू होऊन तो पूर्ववत होईल अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लोकमतशी बोलताना दिली आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्याने माहिती दिल्यानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवन पंपिंग स्टेशन येथे दि. 4 ऑगस्ट मंगळवार व दि. 5 ऑगस्ट बुधवार रोजी वादळी वारा व आणि जोरदार पाऊस (अतिवृष्टी) झाल्याने येथील सूर्या नदीला पूर येऊन सर्वत्र पाणीच पाणी साठले. मात्र या नदीचे मोठया प्रमाणात पाणी हे मासवन पंपिंग स्टेशनमध्ये आल्याने येथील वीज केबल व इतर उपकरणे नादुरुस्त झाली,
तसेच महावितरण कं. च्या 33 केव्ही मुख्य वहिनी पासून मासवन पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशन मधील किवाँस पर्यंत येणारी महावितरणची केबल नादुरुस्त झाली, अखेर तिच्या दुरुस्तीचे काम वीज कर्मचारी व महापालिकेचे कर्मचारी यांनी एकत्रित मिळून अक्षरशः युद्ध पातळीवर हे काम केलं. परंतु पूर्ण केबल बदलणे गरजेचे असल्याने बुधवारी रोजी देखील हे काम पूर्ण होण्यास पूर्ण दिवस लागला, त्यामुळेच मंगळवार व बुधवार सूर्या धरणातून शहरात होणारा पाणी पुरवठा पूर्ण दिवस बंद राहीला तर केबल बदलण्याचे काम पूर्ण झाल्यावरच सूर्या धरणातून होणारा पाणी पुरवठा सुरू केल्याचे पालिकेने सांगितले. विशेषतः या दुरुस्ती चे काम पूर्ण झाल्यावर शहरात टप्याटप्याने पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल तर तरी शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.