पारोळ : वसई तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाने भातशेतीला झोडपून काढल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. चांगले पिकलेले आणि हातात येण्याच्या तयारीत असलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच वेधशाळेने १३ ते १७ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला होता. दोन दिवस ढगाळ वातावरणानंतर बुधवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कापणी केलेल्या व कापणीसाठी तयार असलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले.
दरवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात ७६ हजार हेक्टर क्षेत्र भातशेतीखाली येते. शेतकऱ्यांसह अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा याच भातशेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात रोजगार कमी असल्याने शेतकरी वर्षभर लागणारे भात याच शेतीतून पिकवत असतो, मात्र चालू वर्षी परतीच्या पावसाने कापणी केलेल्या भातपिकावर पाणी फेरले.
आधीच कोरोना महामारीमुळे सर्व कामधंदे बंद असताना शेतकरीवर्ग आज फक्त शेतीवर अवलंबून आहे. भातशेती करताना शेतकरी सहकारी सोसायटी, सोने तारण ठेवून शेती कसत असतो. बी बियाणे, खते, औषधे, मजुरी महाग असतानाही आपला वर्षभराचा खावटीचा प्रश्न सुटावा यासाठी तो मेहनत करत असतो, पण दोन वर्षांपासून भात कापणीच्या वेळीच परतीचा पाऊस हजेरी लावत असल्याने हाती आलेले भात पीक वाया जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण आहे.
या वर्षी भातशेती करणे महाग असतानाही लागवड केली. पण हळवे भात कापणी करताच परतीचा पाऊस सुरू झाल्याने माझ्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करावा. - प्रसाद पाटील, शेतकरी, आडणे
शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या तालुक्यात मागील गेल्या ४-५ दिवसांपासून सायंकाळी धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कुसम झोले यांनी मोखाडा तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी हळव्या भाताची कापणी सुरू आहे, परंतु परतीचा पावसाने भातपिके भिजवली असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मोखाड्यात ९० ते १२० दिवसांत तयार होणाऱ्या हळवार जातीचे भातपीक कापणीसाठी तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची कापणीची कामे जोरात सुरू आहेत, परंतु गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने भातपीक पुन्हा भिजले. मागील वर्षीदेखील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. त्याची अजूनपर्यंत काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही तसेच कोरोनाच्या महामारीत शेतकरी गरीब कुटुंबे देशोधडीला लागली असताना पुन्हा वरुणराजाची अवकृपा होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.