वसई : सर्वच दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या नायगाव रेल्वे स्टेशनवरील वॉटर व्हेडींग मशीन गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. पिण्याच्या पाण्याची दुसरी कोणतीच व्यवस्था नसल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत. प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पाणपोईसाठी सिंटेक्सच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात पाणी नसल्याने नळ कोरडेच आहेत. आयआरसीटीसीने लॅटफॉर्मवरील पाणपोर्इंत ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’च्या माध्यमातून प्रवाशांना शुद्ध पाणी देण्याची योजना आखली आहे. यात प्रिसिजन गाळणी, कार्बन गाळणी, ‘आर ओ’ शुद्धीकरण, मिनरलायझेशन, ‘यूव्ही’ स्टॅबिलायझेशन, ओझॉन स्टिरीलायझेशन या सारख्या नऊ प्रक्रियांद्वारे पाणी शुद्ध करून अल्प दरात प्रवाशांना देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुंबईतील काही रेल्वे स्टेशनवर हा प्रयोग यशस्वी झाला आहे. नायगाव रेल्वे स्टेशनवर वॉटर व्हेेंडींग मशिन बसवण्यात आलेले आहे. बाटली बंद पाण्याइतकेच शुद्ध पाणी मिळणार यामुळे नायगाव स्टेशनवरील प्रवाशी आनंदात होते. मात्र, मशिन बसवून तीन महिने उलटून गेले तरी अद्याप त्यातून पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची निराशी झाली आहे. (प्रतिनिधी)
नायगाव स्टेशनवरील वॉटर व्हेंडींग मशीन बंद
By admin | Published: February 15, 2017 4:20 AM