मुंबई : सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही मुंबई महानगर प्रदेशाच्या पश्चिम उपप्रदेशातील तीव्र पाणी टंचाई समस्येचे निरसन करून या प्रकल्पातून नागरीकांना शुद्ध, पिण्यायोग्य पाणी पुरवठा होणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या पहिल्या भागाची चाचणी आणि योजना कार्यान्वित करणे मार्च २०२३ मध्ये नियोजित आहे. पहिल्या भागातून वसई-विरार शहर महानगरपालिकेला १८५ दश लक्ष लिटर क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल.
नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एमएमआरडीए ४०३ दश लक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारत आहे. या प्रकल्पातील उदंचन केंद्राचे काम ९८% आणि जलशुध्दीकरण केंद्राचे काम ९४% पूर्ण झाले आहे. प्रकल्पात एकूण ८८ किलोमीटरची पाईपलाईन पसरवली जात आहे, तसेच प्रकल्पात दोन बोगदे असणार आहेत. त्यापैकी मेंढवणखिंड बोगद्याचे काम पूर्ण झाले असून तुंगारेश्वर बोगद्याचे काम जलदगतीने सुरू आहे. प्रकल्पाच्या पहिल्या भागाची ९५% प्रगती झाली आहे तर संपूर्ण प्रकल्प ८२% पूर्ण झाला आहे.
सूर्या प्रकल्प हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, कारण पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच एमएमआरडीए मुंबई महानगराच्या पश्चिम उप-प्रदेशासाठी पहिला पाणीपुरवठा प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या भागातून मार्चमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा केला जाईल, ज्यासाठी वसई शहराला त्यांच्या अंतर्गत वितरण प्रणालीला गती द्यावी लागणार असून यासाठी एमएमआरडीए त्यांना मदत करत आहे. तसेच दुसऱ्या भागातून २१८ दश लक्ष लिटर इतका पाणीपुरवठा मीरा भाईंदर महानगरपालिकेला येत्या काही महिन्यांत केला जाईल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास म्हणाले.