- हुसेन मेमन, जव्हार१९९२ पासून गाजत असलेल्या व गुजरात व दादरा नगर हवेली यांच्या सीमेवर असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते आता चका चका होण्याच्या मार्गावर असून नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.दऱ्या खोऱ्यात असलेल्या वावर-वांगणी या गावातील कुपोषणामुळेच जव्हार येथे अप्पर जिल्हाधिाकरी कार्यालयाची स्थापना तात्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केली होती, परंतु त्यानंतर या गावात काहीच झाले नाही. मात्र आता या परिसरातील रस्त्यांची ७० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याने रहिवाशांना चकाचक रस्ते वापरायला मिळणार आहेत. दर वर्षी पावसाळ्यात या गावांना जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता तसेच या परिसरात पाऊस प्रचंड पडत असल्याने हे मार्ग नेहमीच पुराच्या पाण्याखाली जात असतात. त्यामुळे पूर असतांना संपर्क तुटलेला आणि तो ओसरल्यावर मार्ग चिखलाने भरलेला अशी अवस्था असायची परंतु आता या रस्त्यांमुळे पूर ओसरताच रस्ते वापरायला मिळणार आहेत. तसेच बससेवा सुरू होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा भाग म्हणजे वावर वांगणी ग्रामपंचायत या ग्रामपंचायत हद्दीत १२ पाडे २ महसूल गावे असे १४ गाव-पाडे असून या त््यांची एकूण लोकसंख्या ३ हजार २०० आहे. हा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असल्याने या भागात गेल्या अनेक वषार्पासून रस्ते कच्चे आणि खड्डेमय होते. त्यामुळे काळी पिवळी सुद्धा या परिसरात येत नव्हती. दुचाकी अथवा अन्य वाहन वापरणेही अशक्य होते. परिवहनाची नेहमीच गैरसोय, त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य कर्मचारी अशा सगळ्यांचेच दुर्लक्ष अशा अनेक समस्यांनी हा परिसर ग्रस्त होता. त्याला आता विकासाची नवी पहाट दिसू लागणार आहे. तेरा कोटी खर्च, विकास होणार गतिमान- या भागात रस्त्याची सोय व्हावी म्हणून लोकमतने सातत्याने आवाज उठविला होता. त्यामुळे वावर वांगणी भागातील रस्त्याचे काम जलद गतीने चालू झाले आहे. वावर वांगणी भागात जाण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत १३ कोटी रुपये खर्च करून गेल्या दोन वषार्पासून सुरु असलेले रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून ते पावसाळ्यापूर्वी संपण्याची शक्यता आहे. या रस्त्याचे काम यावर्षी शंभर टक्के पूर्ण होणार आहे. त्यामुळे या भागातील परिवहनाची समस्या मार्गी लागणार आहे.
वावर, वांगणीतील रस्ते ७० टक्के पूर्ण
By admin | Published: April 09, 2017 1:04 AM