मुंबई - डहाणू तालुक्यात पावसाची संततधार कायम असून मंगळवारी सकाळपासून जोराचा पाऊस सुरु आहे. तसेच 45 ते 50 किमी असलेला वाऱ्याचा वेग ताशी 60 पर्यंत वाढण्याचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी जिल्हा शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात दिरंगाई केल्याने सकाळ सत्रातील सर्वच शाळा भरल्या. पण, सकाळी दहा वाजेपासून भरणाऱ्या शाळांपर्यंत हा आदेश उशिरा मिळाला. तोपर्यंत विद्यार्थी व शिक्षक शाळेकडे रवाना झाले होते.
मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचा हा आदेश लवकर प्राप्त न झाल्यामुळेच विद्यार्थी घराबाहेर पडल्याचे पालकांनी म्हटले आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सुट्टीचा आदेश पाठविल्याचे त्यांनी सांगितले. तर हा आदेश सकाळी 8 वाजल्यानंतर प्राप्त झाला. त्यानंतर तात्काळ 462 प्राथमिक, 60 माध्यमिक शाळा आणि 8 महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना कळविल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विष्णू रावते यांनी दिली. मात्र, सकाळी 11 वाजेपर्यंत बहुतांश शिक्षक याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, तालुक्यातील ओहळ ,नदी-नाले आणि खाड्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात 12 जुलै पर्यंत अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सकाळी समुद्राच्या भरतीची वेळ 9:48 वाजता असून लाटांची उंची 13.22 फूट राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. पाऊस कायम राहिल्यास समुद्रात पाणी निचरा होण्यात अडथळा येऊन पूरस्थिती उद्भवू शकते. एकंदरीत परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे.