- आशिष राणे
वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेने पालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना काही दिवसांपूर्वी ट्रेड लायसन्स हा कर लावला होता. त्यासंदर्भात भाजपा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली होती. याबाबतीत भाजपाने वसईमध्ये व्यापाऱ्यांशी बैठक करून हा जिझिया कर रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती.
भाजपाने एक पत्रक काढून प्रत्येक व्यापाऱ्याचा या करास कसा विरोध आहे. त्यासाठी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली होती. या पार्श्वभूमीवर होणारा प्रखर विरोध पाहता महापालिकेने या करात दि.8 जानेवारी रोजी एक सवलत आदेश काढून प्रत्यक्ष करात थेट 50 टक्के सवलत दिली आहे. परंतू वसईतील भाजपा या निर्णयावर समाधानी नसून याबाबतीत भाजपाचे जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी तीव्र शब्दात विरोध केला असल्याचे लोकमत ला सांगितले.
वसई विरार महापालिका पूर्वी विरार मधून तर आता ठाण्यातून चालवली जात आहे ?
याविषयी अधिक राजकीय बोलताना उत्तम कुमार यांनी सणसणीत असा राजकीय टोला लगावत सांगितले की,पूर्वी वसई विरार मनपा ही विरार मधून चालवली जायची व आज ती ठाण्यातून चालवत आहेत,तर एक पक्ष कार्यलयाप्रमाणे प्रशासन व तिची कामे केली जात आहेत.किंवा करून घेतली जात आहेत.अर्थातच अशा प्रकारचा पायंडा पडणे म्हणजे भविष्यात महानगरपालिकेवरचा जनतेचा विश्वासच उडून जाईल अशी एकंदरीत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोरखेळ थांबवा ; अन्यथा बविआ व शिवसेनेला सूज्ञ जनता घरी बसविणार ?
सत्तेत असताना बहुजन विकास आघाडी कर लावणार सत्ता गेल्यावर शिवसेना तो प्रत्यक्ष अंमलात आणणार असा हा पोरखेळ बविआ व शिवसेना या दोघा पक्षांनी लावला असून येणाऱ्या निवडणुकीत ठाणे आणि विरार या दोन्ही पक्षांना घरी बसवल्याशिवाय वसईची सूज्ञ जनता आता शांत बसणार नाही.
दरम्यान 50 टक्के कमी केल्याचे जे गाजर महापालिकेने आज व्यापारी वर्गाला दिले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो मुळात जो कर कुठेच नाही तो आम्ही का म्हणून भरायचा? असा सवाल ही यावेळी उत्तम कुमार यांनी व्यक्त केला. परिणामी लवकरात लवकर महापालिका आयुक्त व त्यांच्या प्रशासनाने लावलेला हा जाचक कर तात्काळ रद्द करावा अन्यथा आम्ही आयुक्त गंगाथरन .डी यांना घेराव घालून याचा जाब विचारू असे ही शेवटी उत्तमकुमार म्हणाले.