वसई : वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे. सरकारी जमिनीवर ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करून चाचणी त्याठिकाणी करण्यात यावी यामागणीसाठी जिल्हयातील विविध वाहन संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रवाशी वाहतूक आणि मालवाहतूक करणाºया वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र तपासणी शासकीय मालकीच्या जागेवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवरच घेणे बंधनकारक आहे. तीही दरवर्षी करुन घेणे बंधनकारक आहे. पण, असे ट्रॅक महाराष्ट्र राज्यात अवघ्या १४ ठिकाणीच उपलब्ध आहेत. ज्या कार्यालयात असे ट्रॅक उपलब्ध नाहीत त्यांनी नजिकच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या ठिकाणाही योग्यता प्रमाणपत्र आणि ब्रेक तपासणी करून घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विरार कार्यालयात ट्रॅक उपलब्ध नसल्याने पालघरवासियांनी त्यासाठी कल्याण येथे जावे लागणार आहे.पालघर जिल्हयातील आठ तालुक्यातील वाहनांची नोंदणी करण्यासाठी विरार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सध्या भाड्याच्या जागेत असलेल्या ठिकाणी ब्रेक टेस्ट ट्रॅक्सची सोय नाही. या कार्यालयात दरवर्षी किमान पाच लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या या कार्यालयातून रिक्शा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टरसह इतर प्रवाशी वाहनांसह मालवाहतूक करणाºया वाहनांची लाखांच्या घरात नोंदणी झालेली आहे. तसेच दरदिवशी नोंदणी सुरुच असते. मात्र, या लाखो प्रवाशांना आता कल्याणसारख्या दूरवरच्या ठिकाणी जावे लागणार आहे.- कल्याण पालघर जिल्ह्यापासून खूप अंतरावर आहे. त्याठिकाणी ये-जा करण्यासाठी वेळ, इंधन आणि पैसा खर्ची घालावा लागणार आहे. एका दिवसात चाचणी झाली नाही तर पुन्हा हेलपाटे मारावे लागणार असल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.- उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने त्याप्रमाणेच वागावे लागणार आहे. पण, आदिवासी पालघर जिल्ह्याचा विचार करून परिवहन विभागाने जिल्ह्यात सरकारी जागेत ब्रेक टेस्ट ट्र्ॅक तयार करावेत , अशी मागणी विजय खेतले यांनी केली आहे.
योग्यता प्रमाणपत्रासाठी कल्याणची फेरी; पालघरमधील वाहनचालक नाराज, वाहन संघटना काढणार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:22 AM