वाडा : वाडा, विक्रमगड, जव्हार वनक्षेत्रामध्ये लाकडांच्या तस्करीला उधाण आले असतांना वाडा वनविभागाने मध्यरात्री केलेल्या कारवाईमध्ये खैराची चोरटी वाहतूक करणाऱ्या कारसह दोघा तस्करांना अटक करण्यात आली. तालुक्यातील डोंगरपाडा, नेहरोली येथे रात्री १२.३० च्या सुमारास उभ्या असणाऱ्या एका कारचा संशय आल्याने वन कर्मचाऱ्यांनी या कारमधील दोन आरोपींना अटक केली व या कारवाईत ७ खैराची ओंडके हस्तगत केले आहेत. वनपाल अरुण घाडगे, वनरक्षक तुषार कदम, जावेद खान, बोडके, कुचेकर, ठाकर यांच्या पथकाने रात्र गस्त घालत असतांना ही कारवाई केली.वाडा-भिवंडी महामार्गावर एम.एच. ०२.जे.ए.४६५१ क्रमांकाची एक कार उभी होती. तिचा संशय आल्याने वनविभागाच्या पथकाने त्यांना घेरले मात्र, अंधाराचा फायदा घेऊन दोन जण फरार झाले. मात्र, वनपाल घाडगे यांनी विलास लालचंद्र केदार व चंदनकुमार मंगलराम रा.नेहरोली या दोघांना पकडले. या गाडीत खैराचे ७ ओंडके असल्याचे आढळले. पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)
खैर तस्करांचा रात्रीस खेळ चाले...
By admin | Published: January 24, 2017 5:29 AM