- वसंत भोईर, वाडा
गेल्या अनेक दिवसांपासून वाडा तालुक्यातील जंगलामधील तस्करांनी खैराची अवैध तोड करून त्याची तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे. वनविकास महामंडळाचे अपुरे मनुष्यबळ आणि वाहनांचा अभाव यामुळे ते वनांच्या रक्षणासाठी व खैराच्या तस्करीला आळा घालण्यास ते असमर्थ ठरत आहे. साडेपाच हजार हेक्टर वरील वनांचे रक्षण करण्यासाठी मुळातच तोकडे मनुष्यबळ असतानाही वनपालाचे १ तर वनरक्षकांची ४ पदे रिक्त आहेत. गस्तीवाहनांचा पत्ता नाही. कार्यालयाचे संगणकीकरण नाही, अशी दारुण अवस्था आहे. त्यामुळे तस्करांचे फावते आहे. आठ दिवसांत वनविभागाच्या हाताला खैराची तस्करी करणारे एखादे तरी वाहन लागत असून परवा एकाच रात्री दोन वाहनांवर झालेल्या कारवाईने आता जंगलाच्या व विशेषत: खैराच्या झाडांबाबतची चिंता वाढली आहे. वृक्षांची तोड झाली की सगळ्यांसमोर येते ते प्रादेशिक वनविभाग! मात्र अनेकदा किंबहुना सर्वच वेळा मिळालेला माल हा एकतर वन्यजीव विभागातील असतो किंवा वनविकास महामंडळाच्या हद्दीतील असतो.वनविकास महामंडळ हा विभाग प्रकाशझोतापासून दूर असून तो जंगलाच्या रक्षणासाठी असमर्थ आहे. या परिक्षेत्राकडे खुपरी, सावरखांड, वाडा, कंचाड व पोशेरी अशा पाच परिमंडळात सुमारे ५ हजार हेक्टर वनक्षेत्र संरक्षणासाठी आहे. ज्यात आजही मोठ्या प्रमाणात खैर अस्तित्वात आहे, असे असतांना परिक्षेत्रात अवघे ४ वनपाल व ७ वनरक्षक असून वनपालाचे १ व वनरक्षकाची ४ पदे रिक्त आहेत. रात्रगस्त घालण्यासाठी वाहन नसल्याने कर्मचारी आपल्या दुचाकीवरून गस्त घालतात ती अपुरी ठरते. तसेच ती कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. या कार्यालयाने अद्याप संगणक पाहिलेलाच नाही. शिवाय कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही अशी काहीशी अवस्था आहे.खैराची चोरटी तोड फक्त वनविकास महामंडळ यांच्या हद्दीत होत असल्याचे गेल्या काही दिवसात पकडलेल्या वाहनांवरून स्पष्ट होत आहे. प्रादेशिक विभागाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगल आहे तेथेही खैर आहे. मात्र खैराची होणारी तोड फक्त वनविकास महामंडळाच्या हद्दीतच का होते? असा प्रश्न सध्या जनतेत चर्चिला जात आहे. त्याचे कोणते उत्तर वनखात्याकडे आहे?गस्त, तपासणी ठप्पमुळात महामंडळाकडे कर्मचारी अत्यल्प असून रात्र गस्त, जंगल तपासणी अशी अनेक कामे होतच नाहीत. शिवाय प्रादेशिक विभागाशी असणारी अंतर्गत धुसफूस व त्यामुळे जंगल संरक्षणाकडे होत असणारे दुर्लक्ष याचा बरोब्बर फायदा खैर तस्कर उठवित आहेत. ते वनविकास महामंडळाच्या दुबळे पणाचा फायदा घेऊन खैरासारख्या मौल्यवान वृक्षाची अक्षरश: लूट करीत आहेत. हे प्रकार आता तात्काळ थांबले पाहिजे. त्यासाठी महामंडळ वनविभागात विलीन करण्याची वेळ आली तरी चालेल पण आमचे जंगल आता वाचावा असे म्हणण्याची वेळ आली आहे.