वाडा : आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी संघटनेने मोर्चा काढला. या सरकारचे करायचे काय; खाली डोके वरती पाय, पंकजा मुंडे हाय हाय, आमच्या मागण्या मान्य करा; नाहीतर खुर्च्या खाली करा, पाच रूपयांचा कडीपत्ता; सवरा साहेब बेपत्ता अशा घोषणांनी वाडा शहर दणाणून गेले होते.येथील खंडेश्वरी नाका येथून रॅलीला सुरवात झाली. रॅली संपूर्ण वाडा शहरात फिरून तिचे तहसील कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झाले. मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह, प्रदेश उपाध्यक्षा वनिता देशमुख यांनी केले. सन १८७५ साली योजना चालू केल्यापासून अंगणवाडी कर्मचा-यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे किंवा त्या कार्यक्षम असेपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. असे असताना अलीकडेच महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांचे निवृत्ती वय ६५ वरून ६० वर्षे केले आहे. बहुसंख्य अंगणवाडी सेविका व मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील आहेत. त्या मिळणाºया मानधनावर आपले जीवन व संसार सांभाळतात. ६०व्या वर्षी सेवानिवृत्त केल्यामुळे राज्यात १३ हजार व पालघर जिल्ह्यÞात सुमारे एक हजार अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहेत. तसेच त्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे ते पूर्ववत ठेवावे या मागणीकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी बंदोबस्त चोख असल्याने वाहतूक सुरळीत होती.
या सरकारचे करायचे काय; खाली डोके वरती पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:19 AM